Sun, Mar 24, 2019 06:47होमपेज › Belgaon › मराठी फलकाला काळे

मराठी फलकाला काळे

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 05 2018 12:04AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कानडी दुराभिमान्यांचा मराठीद्वेष उफाळून आला आहे. निलजी गावच्या वेशीत ग्रामपंचायतने मराठी व कन्नड भाषेत उभारलेल्या स्वागत फलकावरील मराठी अक्षरांना  काळे फासण्यात आले आहे. शिवाय, कन्नडमध्ये नम्म बेळगावी असे लिहिण्यात आले आहे. या प्रकारामुळे  मराठी भाषिकांतून संताप व्यक्त होत आहे. 

ग्रा.पं.च्या वतीने गावच्या वेशीत सुस्वागतम असा फलक मराठी व कन्नड दोन्ही भाषांत आहे. ग्रा.पं. कार्यक्षेत्रात मराठी, कन्नड भाषिक राहत असल्यामुळे दोन्ही भाषांतून मजकूर आहे. मात्र, गुरुवारी रात्री अज्ञातांनी मराठी भाषेतील अक्षरांना काळे फासून त्यांवर नम्म बेळगावी असे कानडीत लिहिले आहे. त्याचबरोबर बेळगावच्या ठिकाणी बेळगावी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी  उघडकीस आला. ग्रामस्थांनी ही माहिती पंचायत सदस्यांना दिली.  सदस्यांनी फलकाची पाहणी केली.

विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत असा प्रकार घडल्यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे कर्नाटक सरकार मराठी भाषेतून फलक लावण्यास प्रतिबंध करत असताना दुसरीकडे मराठी भाषिकांकडून उभारण्यात आलेल्या फलकाला डांबर लावण्याचा प्रकार कानडी दुराभिमान्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे दोन भाषिकांत तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून  याप्रकरणी दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी मराठी भाषिक जनतेतून करण्यात येत आहे.

निलजीतील प्रकाराबद्दल रात्रीपर्यंत पोलिसांत तक्रार नोंद झाली नव्हती. मात्र ग्रामपंचायतीने हा फलक उभारलेला असल्याने पंचायतीने तक्रार दाखल करावी, अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.