Sat, Apr 20, 2019 18:48होमपेज › Belgaon › सीमा सत्याग्रहींमुळेच लढा टिकून

सीमा सत्याग्रहींमुळेच लढा टिकून

Published On: Mar 01 2018 1:57AM | Last Updated: Mar 01 2018 1:55AMजांबोटी : वार्ताहर

साठ वर्षांपासून सुरू असलेली न्यायालयीन  लढाई आतापर्यंतच्या सीमा सत्याग्रहींमुळेच जिवंत असल्याचे सांगत केंद्र सरकार आणि न्यायालयाला पुन्हा लोकेच्छा दाखवून द्या, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. 

जांबोटीत बुधवारी पार पडलेल्या सीमा मेळाव्यात ते बोलत होते.  मा.सभापती मारुती परमेकर यांनी स्वागत केले. व्यासपीठावर आ.अरविंद पाटील, माजी आ.मनोहर किणेकर, मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, दत्ता उघाडे, खानापूरच्या सभापती नंदा कोडचवाडकर, उपसभापती श्‍वेता मजगावी, नंदगड जि.पं.सदस्य सुप्रिया कुट्रे, ता. पं. सदस्य पुंडलिक पाटील, जांबोटी पंचायत अध्यक्षा राजश्री परमेकर, देवापण्णा गुरव, संजय मोरे, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई आदी मान्यवर होते.

 अष्टेकर पुढे म्हणाले, निपाणी, बेळगाव, खानापूर बिदर, भालकीसह मराठी भाषिक असलेल्या 865 गावांवर महाराष्ट्राने आपला हक्क सांगत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, 1956 साली झालेल्या भाषावर प्रांतरचनेवेळी वरील मराठी भाषिक खेड्यांना अन्यायाने म्हैसूर राज्यात डांबण्यात आले. त्या दिवसापासून कानडी सरकारकडून या-ना त्या कारणाने मराठी माणसांना डिवचण्याचे काम सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात यापुढे होणार्‍या सुनावणीसाठी येथील लोकेच्छेची नोंद महत्वाची आहे.त्यासाठी सीमावासियांनी समितीच्या पाठीशी रहावे. आ.अरविंद पाटील म्हणाले, आम्हीही मराठी असल्याचे सांगत आमदकीचे स्वप्न बघणार्‍यांकडूनच सीमावासियाां अमानुष मारहाण झाली होती, गुन्हे दाखल करण्यात आले असून समितीवर बोलण्याचा त्यांना कोणताच नैतिक अधिकार  नाही. 
तालुक्यासह जांबोटी भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.  ग्रा.पं. सदस्य भरणकर यांनी आभार मानले.