Fri, Aug 23, 2019 22:16होमपेज › Belgaon › मराठा आरक्षणासाठी जीवनयात्रा संपविली; मृत दड्डी येथील तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी जीवनयात्रा संपविली; मृत दड्डी येथील तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्येचे लोण रविवारी कोल्हापुरातही पोहोचले. कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विनायक परशराम गुदगी (वय 27, मूळ रा. दड्डी, ता. हुक्केरी) या तरुणाने रविवारी आपल्या राहत्या घरी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची महिती कळताच त्याचे तीव्र पडसाद शहरासह ग्रामीण भागातही उमटले. 

दसरा चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. तसेच विनायकला श्रद्धांंजली वाहण्यात आली. दसरा चौकातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. त्यामुळे दसरा चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. कणेरीवाडी येथेही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी कणेरीवाडी बंदची हाक देण्यात आली आहे.

परशराम गुदगी मूळचे कर्नाटकातील दड्डी (ता. हुक्केरी) गावचे. कामानिमित्त ते कोल्हापुरात आले व स्थायिक झाले. कणेरीवाडी येथे पत्नी व दोन मुलांसह ते राहतात. विनायक हा त्यांचा मोठा मुलगा. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याने डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर तोही गोकुळ शिरगाव येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. कणेरीवाडी पंचक्रोशीतील गावांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विनायक सहभागी झाला होता.

गळफास घेऊन संपवले जीवन

विनायकला चांगली नोकरी मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. आई, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे दोघे भाऊच घरात होते. भाऊ प्रमोद बाथरूमला गेल्याने विनायक घरी एकटाच होता. घरात कोणीच नसल्याचे पाहून साडेबारा वाजण्याच्या सुमारास विनायकने दार बंद करून घेतले व घरातच गळफास लावून घेतला.      

बाथरूमला जाऊन येईपर्यंत भाऊ विनायक असे काही तरी करेेल, याची यत्किंचितही कल्पना प्रमोदला नव्हती. बाथरूममधून आल्यानंतर त्याला विनायकने साडीने तुळईला गळफास लावून घेतल्याचे दिसले. तसाच ओरडत तो घराबाहेर आला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले.

लोकांच्या मदतीने विनायकला खाली उतरविण्यात आले. या घटनेची माहिती वार्‍यासारखी गावात पसरली. त्याला उपचारासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ सीपीआरला नेले; पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती कळताच तरुण विनायकच्या घराकडे धाव घेऊ लागले.

सीपीआर आवारात गर्दी

मृतदेह सीपीआरला नेण्यात आल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थांनी सीपीआरकडे धाव घेतली. त्यामुळे सीपीआरच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. शवविच्छेदन करून विनायकचा मृतदेह चार वाजण्याच्या सुमारास कणेरीवाडीत आणण्यात आला. यावेळी हातातोंडाशी आलेला आपला मुलगा निघून गेल्याने विनायकच्या आईने अंत्यदर्शन घेताना फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी जमलेल्या लोकांनाही अश्रू अनावर झाले.

मातेचा हंबरडा : आज कणेरीवाडी बंद

विनायकचा मृतदेह गावात येताच ‘विनायक अमर रहे’, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विनयकला श्रद्धांजली वाहण्यात आली. या घटनेबद्दल शोक व्यक्त करून सोमवारी कणेरीवाडी बंदची हाक देण्यात आली. यानंतर विनायकचा मृतदेह त्याच्या दड्डी या मूळ गावी नेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत, पोलिस पाटील शिवाजी मोरे, सरपंच शोभा खोत, विनोद खोत, प्रदीप केसरकर, अजित मोरे, रवी मोरे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दसरा चौकात रास्ता रोको

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची बातमी समजताच, त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले. गटागटाने तरुण दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. पोलिसांनाही या घटनेची माहिती कळताच त्यांनी दसरा चौकातील बंदोबस्तात प्रचंड वाढ केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी दसरा चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. विनायकचा मृतदेह कणेरीवाडीला नेत असताना, काही काळ दसरा चौक येथे ठेवण्यात आला. या ठिकाणी त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.