Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Belgaon › मागण्या मान्य करा, अन्यथा ठोक मोर्चा

मागण्या मान्य करा, अन्यथा ठोक मोर्चा

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 11:14PMधारवाड : वार्ताहर 

कर्नाटकातही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून या आधी लाखोच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन  देण्यात आले.पण अजूनही त्या मागण्या मान्य  झालेल्या नाहीत. कर्नाटक शासनाने मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करून अध्यादेश जारी करावा अन्यथा, ठोक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शनिवार दि. 4 रोजी धारवाड परिसरातील मराठा समाजाने हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

कर्नाटकात मोठ्या संख्येने मराठा समाज आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी केवळ मतांसाठी त्यांचा उपयोग करुन घेतला. त्यांना विकासापासून वंचितच ठेवले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

कर्नाटकातील मराठा समाजाला 3 ब तून 2 अ मध्ये समाविष्ट करावे, धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये स्वतंत्र छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन विद्यापीठ स्थापन करावे, मराठा समाजाला प्राथमिक ते पदवीपूर्ण शिक्षणात आरक्षण ठेवावे, छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाचा विकास करुन राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

कर्नाटक शासनाने मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करुन अध्यादेश जारी करावा अन्यथा महाराष्ट्रात जसे ठोक मोर्चे होताहेत तसे कर्नाटकातही मराठा समाज ठोक मोर्चे काढल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा देण्यात आला.

बसवराज जाधव, भीमाप्पा कसाई, नारायण हुबळी, विजय भोसले, मंजुनाथ कदम, पी. के. निर्लकट्टी  आदी मोर्चात सहभागी झाले होते.