Thu, Apr 25, 2019 08:13होमपेज › Belgaon › निपाणीत ठोक मोर्चा, बंद

निपाणीत ठोक मोर्चा, बंद

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:46AMनिपाणी : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रासह सीमाभागातील 865 गावांतील मराठा समाजातील युवकांना 16 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी निपाणी बंद करून तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. शनिवारी निपाणी शहरात उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. रिक्षा व वडाप व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने शहरातील नेहमी गजबजलेल्या मार्गावर शुकशुकाट पसरला होता.

महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चे काढूनही महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी निपाणी बंदचे आवाहन करण्यात आले होते.

शहरातील बसस्थानक तसेच अशोकनगर, नेहरू चौक, भाजीमार्केटसह परिसरातील हॉटेल्स, छोटे व्यावसायिक, कपड्यांची दुकाने, सराफ व्यापारी, किराणा-भुसार मालांचे व्यापारी यांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शहरात शुकशुकाट पसरला होता. बंदमधून शाळा, दवाखाने व औषध दुकाने वगळण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळी 11.30 वा. धर्मवीर संभाजीराजे चौकातून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या ठोक मोर्चाच्या अग्रभागी महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. 

सकल मराठा समाजाने राजकीय नेत्यांना मोर्चाच्या मागून येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या मागच्या  बाजूला होते. छ. शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

अशोकनगर, कोठीवाले कॉनर्र्र, नेहरू चौक, चाटे मार्केट, शिवाजी चौक, बेळगाव नाका मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे श्रद्धा संकपाळ या विद्यार्थिनीने विचार मांडले. ती म्हणाले, काकासाहेब शिंदे या तरुणो मराठा आरक्षणप्रश्‍नी जलसमाधी घेतली आहे. त्यांचे बलिदान वाया जावू नये. महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठा समाज बांधवांना 16 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे हा लाभ महाराष्ट्र शासनाने दिला पाहिजे. 

यावेळी तहसिलदार चिदंबर कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात सुमारे 5 हजार विद्यार्थी, युवक व नागरिकांचा सहभाग होता.
डीएसपी दयानंद पोवार, सीपीआय किशोर भरणी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.