Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Belgaon › मान्सूनपूर्व खरेदीची बाजारात धूम

मान्सूनपूर्व खरेदीची बाजारात धूम

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 10:44PMबेळगाव : प्रतिनिधी

मान्सूनपूर्व खरेदीसाठी शहरात रविवारी नागरिकांची झुंबड उडाली. यामुळे बाजारपेठ ग्राहकांनी भरून गेली होती. रमजानबरोबर विद्यार्थ्यांची लगबग, पावसाळी  साहित्याची खरेदी आणि शेतीकामासाठी शेतकर्‍यांची उडालेली लगबग यामुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते. शहरातील प्रमुख भागात गर्दी ओसंडली होती.

शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांसह पहिल्या रविवारी बाजारात हजेरी लावून शालेय खरेदी करण्यास गर्दी केली होती. शिक्षकांनी सांगितलेल्या साहित्याबरोबर अन्य वस्तूंची खरेदी करण्यास विद्यार्थ्यांनी लगबग केल्याचे दिसून आले. 

विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, कंपास, गणवेश, दप्तर, रेनकोट, छत्री खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यामुळे बाजारात पालकांसह विद्यार्थी फिरत असताना दिसून येत होते. विशेषत: गणपत गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर, पांगुळ गल्ली, रामदेव गल्ली  परिसरातील शैक्षणिक साहित्याची दुकाने गजबजून गेली होती. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यांच्याकडून खरेदीला रविवारची पसंती देण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठेत मुसलमान बांधव परिवारासह सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दिसून आले. 

शहरातील खडेबाजार, भेंडीबाजार, शनिवार खुट, मेणसी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली भागात मुसलमान बांधवांसाठी खास सणासाठी व्यापार्‍यांनी दुकाने उभारली आहेत. या ठिकाणी वस्त्रप्रावरणे, खाद्यपदार्थ, अत्तर, पादत्राणे आदी वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत होेते.

येत्या 6 जूननंतर मृग नक्षत्र सुरू होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची लगबग उडाली आहे. मान्सूनपूर्व खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिकांचीही खरेदीसाठी गर्दी केली होती. पावसाळी वस्तू खरेदी करण्यावर त्यांच्याकडून भर देण्यात येत होता. छत्री, रेनकोट, प्लास्टिक, कडधान्य, मसाल्याच्या दुकानातून गर्दी झाली होती. एकाच दिवशी अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधल्याने बाजारपेठेत गर्दी झाली होती. यामुळे व्यापार्‍यांनी मान्सूनपूर्व बाजारपेठ कॅश केली. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडस उभारले होते. रामदेव गल्ली परिसरातून केवळ दुचाकींना प्रवेश देण्यात येत होता. 

गोव्यातूनही गर्दी

रविवारी गोवा परिसरातूनही खरेदीसाठी नागरिकांनी शहराकडे धाव घेतली होती. यामुळे बाजारपेठेतील गर्दीत भर पडली. अनेक दुकानांतून गोवा भागातून आलेले नागरिक दिसून येत होते. रामदेव गल्ली येथील वाहन पार्किंग येथे वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी गर्दी रोखण्यासाठी बॅरिकेडस उभे केले होते.