Thu, Apr 25, 2019 05:36होमपेज › Belgaon › प्रेमविवाह केलेल्या युवतीचा खून

प्रेमविवाह केलेल्या युवतीचा खून

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

प्रेमविवाहाला होणारा विरोध डावलून प्रेमविवाह केलेल्या युवतीचा सासरच्या मंडळींनी गळा दाबून खून केल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड येथे उघडकीस आली आहे. सुमा युवराज अब्बार (वय 21) असे मृत विवाहितेचे नाव आहे.  घटनेनंतर सुमाचा पती युवराज, सासरा बसाप्पा, सासू महादेवी, दीर यल्लाप्पा हे फरारी झाले आहेत. याप्रकरणी सुमाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीचा खून झाल्याची तक्रार दोडवाड पोलिस ठाण्यात केली आहे. 

सुमा व युवराज यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. हा विषय सुमाच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर या विवाहाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केला होता. तरीदेखील युवराज व सुमा या दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून 10 महिन्यांपूर्वी बैलहाेंंगल येथील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. यानंतर युवराजच्या कुटुंबीयांचा विरोध मावळला होता. ग्रामस्थांच्या उपस्थितीत युवराजच्या पालकांनी जोडप्याची घरभरणी करून घेतली होती. 

मात्र काही दिवसांनंतर युवराज आणि सुमाचे खटके उडू लागले. यामुळेच सदर कुटुंबियांनी आपल्या मुलीचा खून केल्याचा आरोप सुमाच्या पालकांनी केला आहे. याबाबत दोडवाड पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करून फरार संशयित आरोपींचा शोध हाती घेतला आहे. सुमाच्या मृतदेहाची जिल्हा इस्पितळातचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.