Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Belgaon › महावीर शोभायात्रेतून सामाजिक संदेश

महावीर शोभायात्रेतून सामाजिक संदेश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शहरातून गुरुवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेतून सामाजिक संदेश देण्यात आला. यंदा शोभायात्रेत सजीव देखाव्यांसह  प्रबोधनपर उपक्रमही राबविण्यात  आले. यामुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरली. 

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मध्यवर्ती उत्सव संघ, कर्नाटक सरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेसह विविध कार्यक्रम पार पडले. संयुक्त महाराष्ट्र चौक येथे शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. नया सागरजी व मुनीनंद अभिनंदन स्वामीजी यांनी मंगलाचरण सादर केले. निवासी जिल्हाधिकारी  डॉ.  बुद्याप्पा, प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, समाजाचे अध्यक्ष पुष्पदंत दोड्डण्णावर, गोपाळ जिनगौडा, सेेवंतीलाल शहा, राजू दोडण्णावर, हिराचंद कालमणी,  कुंतीनाथ कालमणी, केएचईआरचे व्हा. चान्सलर डॉ. विवेक सावजी, अ‍ॅड. अनिल बेनके उपस्थित होते. गौरव कार्यदर्शी राजेंद्र जैन यांनी स्वागत व प्रास्ताविक करून महावीर यांच्या आचार -विचाराबद्दल माहिती दिली. 

डॉ. विवेक सावजी म्हणाले, जगात शांतता नांदायची असेल तर महावीर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी महावीरांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक एकोपा टिकविण्यात महावीर यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या विचारानेच जगात शांती नांदेल. 

यानंतर शोभायात्रा रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, टिळक चौक, मठ गल्ली, शनिमंदिर, एसपीएम रोड, अशी मार्गस्थ झाली. शोभायात्रेत सुमारे 12 हजार भाविकांची उपस्थिती होती. दिवसभर पार पडलेल्या महाप्रसाद वितरणाचा लाभ सुमारे 30 हजार भाविकांनी घेतला. 

शोभायात्रेत विविध प्रकारचे आकर्षक  रथ होते. 6 झांजपथकांनी रंगतदार नृत्य सादर केले. यामध्ये धनगर मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ढोलवादनास उत्स्फूर्त दाद मिळाली. 
शोभायात्रेत यंदा सामाजिक प्रबोधनावर भर दिला होता. महिला मंडळाने बालविवाहाविरोधात हातात फलक घेऊन जनजागृती केली. एका चित्ररथात भगवान महावीर यांच्या मूर्तीवर गाईकडून अभिषेक घालण्याचा एक प्रसंग उभारला होता. यातून गोरक्षण संदेश दिला. दुसर्‍या चित्ररथात डोंगरदर्‍या दाखवून भगवान महावीर यांच्या 13 प्रतिकृती उभारल्या होत्या. यातून पर्यावरण रक्षणात निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एका चित्ररथात मोरपिसांच्या गुहेत महावीरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. एका रथावर लहान मुले झाडाखाली महावीर यांच्या रूपात तपश्‍चर्या करतानाच सजीव देखावा साकारला आहे.


  •