Sat, Mar 23, 2019 00:27होमपेज › Belgaon › महाराष्ट्रीय नेते ‘कानडी’ प्रचारात

महाराष्ट्रीय नेते ‘कानडी’ प्रचारात

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 27 2018 11:17PMबेळगाव ः प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नामुळे सीमाभागात प्रचारासाठी येण्यास अनुत्सुकता दाखविणारे महाराष्ट्रातील अनेक नेते पक्षाच्या प्रचारासाठी हजेरी लावणार आहेत. मराठी बहुभाषिक भागात भाजप-काँग्रेसच्या प्रचाराची धुरा ते सांभाळणार असून यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सँडलवूड आणि टॉलिवूडमधील अभिनेतेही प्रचारात उतरणार आहेत.

निवडणुकीतील प्रत्येक जागा राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांबरोबर अभिनेत्यांना साकडे घालण्यात आले आहे. येत्या काळात त्यांच्याकडे प्रचाराची धुरा देण्यात येणार असून ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. 

सीमाभागात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा कौल  निर्णायक ठरत असतो. यामुळे त्यांच्याकडे मतयाचना करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ. अमित देशमुख आदी येणार आहेत. यामुळे मराठी नेत्यांचा ‘कानडी’ प्रचार रंगणार आहे. 

बेळगाव जिल्हा संमिश्र भाषक संस्कृती असणारा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी महाराष्ट्र-गोवा आणि कानडी संस्कृतीचा मिलाफ झालेला आहे. कानडीबरोबर मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे या मतदारांना जाळ्यात ओेढण्यासाठी पक्षांकडून मराठी नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभा होणार आहेत. त्यांची पहिल्यांदाच खानापुरात सभा आयोजित केली असून ते मतांची याचना करणार आहेत.

भाजपतर्फे एक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील प्रचारात सहभागी होणार आहेत. यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, निजदनेही उत्तर कर्नाटकवर लक्ष केंद्रित केले आहे. या भागातून किमान 15 जागांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असून यासाठी अभिनेत्यांचे कार्ड वापरण्यात येणार आहे. 

भाजपचे स्टार प्रचारक

 पंतप्रधान नरेंद्र मोदी
 अमित शहा
  देवेंद्र फडणवीस
  अभिनेत्री श्रुती 
  नितीन गडकरी
  राजनाथ सिंग
  सुुषमा स्वराज

काँग्रेस स्टार प्रचारक

  पृथ्वीराज चव्हाण
  गुलाम नबी आझाद
  मोहम्मद अझहरुद्दीन
  अमित देशमुख

निजदचे स्टार प्रचारक

  एच. डी. कुमारस्वामी
  अभिनेता निखिल
  अभिनेता पवन कल्याण
  अभिनेता पवन 
  अभिनेत्री पूजा गांधी