Sat, Mar 23, 2019 18:14होमपेज › Belgaon › लोकेच्छा सार्वभौम, फंदफितुरी टाळा

लोकेच्छा सार्वभौम, फंदफितुरी टाळा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

लोकशाहीमध्ये लोकेच्छा सार्वभौम असते. हे मानून आम्ही सीमाप्रश्‍नासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दुसरीकडे लोकेच्छा व्यक्त करण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. मागीलवेळी फंदफितुरीमुळे दोन जागा गमवाव्या लागल्या. तरीदेखील आमची हिम्मत हरलेली नाही. यावेळी फंदफितुरी टाळा आणि पाचही जागावर विजय मिळवा असे प्रतिपादन प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले. सीपीएड मैदानावर म. ए. समितीतर्फे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सभा झाली.त्यावेळी अध्यक्षस्थानावरून प्रा. पाटील बोलत होते.

प्रा. पाटील म्हणाले, बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनानंतर सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायायलात नेण्यात आला. साहित्यिक य. दि. फडके यांनी संमेलनाध्यक्ष पदावरून बोलताना सीमाप्रश्‍न न्यायालयात नेण्याची सूचना केली. त्यानंतर कायदेतज्ज्ञांची समिती नेमून हा प्रश्‍न न्यायालयात नेण्यात आला. आता एका सेकंदात कोणताही पुरावा आम्ही सादर करू शकतो, इतकी तयारी आम्ही केलेली आहे. 

खा. धनंजय महाडिक म्हणाले, नव्या पिढीने जुन्या पिढीचा आदर्श घेऊन लढायची आवश्यकता आहे. सीमाबांधवांच्या जखमा भळभळत्या आहेत. सीमाबांधवांना महाराष्ट्रात जाण्याची आस लागून राहिलेली आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसाला अनेक प्रकारच्या यातना देत आहे. बेळगाववर हक्क सांगण्यासाठी अन्यायाने सुवर्णसौध उभारली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमाबांधवांनी एकत्र येवून निवडणूक लढवावी. कोल्हापूरची जनता सीमाबांधवासोबत आहे. तुम्ही कधीही हाक मारा आम्ही धावून येवू.

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, सीमावासियांनी शिवरायांचा बाणा जपला आहे. संघर्ष त्यांनी सातत्याने सुरू ठेवला आहे. येत्या निवडणुकीत संधी मिळालेली आहे. एक होऊन समिती उमेदवारांना निवडून आणा.

कोल्हापूर जि. पं. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, स्वातंत्र्यानंतरची हा सर्वात मोठा लढा आहे. येथील मराठी जनता 62 वर्षानंतरदेखील महाराष्ट्रात येवू इच्छिते यामध्ये येथील सरकारचे अपयश आहे. याचा विचार कर्नाटकाने करावा. मराठीचा स्वाभिमान खर्‍या अर्थाने सीमाबांधवांनी जपला आहे. 

प्रास्ताविक  दीपक दळवी यांनी केले. माजी आ. मनोहर किणेकर यांनी स्वागत, प्राचार्य आनंद मेणसे सूत्रसंचालन  केले. मालोजी अष्टेकर यांनी आभार मानले. आमदार अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, निपाणी अध्यक्ष जयराम मिरजकर, बिदरचे अध्यक्ष रामनाथ राठोड, खानापूरचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील,  सुभाष ओऊळकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.


  •