Sun, Mar 24, 2019 17:16होमपेज › Belgaon › एकीच्या प्रक्रियेतील अडथळे करा दूर

एकीच्या प्रक्रियेतील अडथळे करा दूर

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:47AMबेळगाव ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मराठी उमेदवार निवडून यावेत, यासाठी मागील काही महिन्यापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यामध्ये खो घालण्याचे काम काही नेत्यांकडून सुरू आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वावर शंका निर्माण करण्याचे काम करण्यात आहे. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत एकीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सुरेश हुंदरे यांच्या नावालाच विरोध करून आपले खायचे दात दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र 2008 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत, असा आग्रह सीमावासी करत आहेत.

म. ए. समितीच्या बेकीच्या राजकारणाला आवर घालण्यासाठी सुरेश हुंदरे यांच्या नावाने स्मृतिमंच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर काही युवकांनी मराठी पाईक या नावाने मागील तीन महिन्यापासून एकीची हाक दिली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकत्र येवून मराठी हिताची भूमिका घ्यावी, अशी भूमिका मांडण्यात येत आहे. याच आशयाचे निवेदन नेत्यांना दिले आहे. परंतु गेंड्याच्या कातडीच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चीच टिमकी वाजविण्याचे उद्योग सुरूच ठेवले आहेत. यामुळे निवडणूक केवळ 18 दिवसावर येऊन ठेपली असतानादेखील चर्चेचे गुर्‍हाळ रंगवून सामान्य मराठी जनतेची दिशाभूल चालविली आहे.एकीच्या पाईकांनी प्रा. एन. डी. पाटील यांची भेट घेवून एकी झाल्याशिवाय उमेदवार जाहीर करू नयेत अशी विनंती केली. त्यांनीही एकीसाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे सांगून एकीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. मात्र दुसर्‍या गटाने स्वत: बैठकीला येणे टाळले. तर काहीवेळा उपस्थित राहून स्वत:चे तुणतुणे वाजविले.

2013 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरेश हुंदरे यांनी अपार कष्ट घेवून दोन मतदार संघात एकी केली. काहीच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ग्रामीणमध्ये बंडखोरीला उत्तेजन देण्यात आले. यातून अधिकृत उमेदवाराचा निसटता पराभव झाला. हुंदरेनी केलेले प्रयत्न लक्षात ठेवून मराठी उद्योजकांनी ज्येष्ठ सीमासत्याग्रही अ‍ॅड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली एकीचे प्रयत्न चालविले आहेत.

तथापि, हुंदरेच्या नावाचीच काहीजणांना अ‍ॅलर्जी झाल्याचे दिसून येते. बैठकीत या नावावर एका नेत्यांने आक्षेप घेतला. हुंदरे यांच्या नावाऐवजी अन्य हुतात्म्याचे नाव देण्याची सूचना केली. हा व्यक्तिद्वेष की संघटनाद्वेष याबाबत मराठी जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या दोन्ही गटांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मराठी मतांचे विभाजन होणार आहे. याचा लाभ राजकीय पक्षांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे. एकीच्या प्रक्रियेत आडव्या येणार्‍या शुक्राचार्याला बाजुला सारून मराठी हितासाठी इच्छुकांनी योग्य उमेदवारांना पाठिंबा दिल्यास जनतेतून दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 

Tags : maharashtra ekikaran samiti, karnataka election 2018, belgaon