Tue, Jul 16, 2019 14:07होमपेज › Belgaon › मंगळुरात चुंबकाने काढला चुंबक

मंगळुरात चुंबकाने काढला चुंबक

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:38AMमंगळूर : प्रतिनिधी

घशात अडकलेला लोहचुंबक बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी दुसर्‍या शक्‍तिशाली लोहहचुंबकाचा यशस्वीपणे वापर केल्याची घटना मंगळूर केएमसी रूग्णालयात नुकतीच घडली. खेळताना नऊ वर्षीय मुलीच्या श्‍वसननलिकेत खेळण्यातील लोहचुंबक अडकला. पालकांना याची कल्पना नव्हती. तिला श्‍वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्याने तत्काळ तिला केएमसीमध्ये दाखल करण्यात आले. घशाचा एक्स रे काढल्यानंतर उजव्या फुफ्फुसाकडे जाणार्‍या श्‍वसननलिकेत कोणतीतरी वस्तू अडकल्याचे डॉक्टरांना दिसून आले.

बालरोगतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. जयतीर्थ जोशी यांनी ब्राँकोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. श्‍वासोच्छवासाच्या त्रासाबरोबरच श्‍वसननलिकेला काही इजा पोचली का, याची तपासणी करण्यासाठी त्यांनी तयारी केली. चुंबक काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

श्‍वसननलिकेत अडकलेल्या चुंबकाचा आकार लांबट आणि गुळगळीत होता. एन्डोस्कोपी करून चिमट्याच्या सहाय्याने तो काढणे कठीण होते. या प्रयत्नात श्‍वसननलिकेला इजा पोहोचण्याची शक्यता होती. शस्त्रक्रिया करताना भूल दिली तरी मुलीला श्‍वासोच्छवास करण्याता अडचण येणार होती. अखेर चुंबक काढण्यासाठी शक्‍तीशाली चुंबकाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्राँकोस्कोपच्या आधारे शक्‍तीशाली चुंबक श्‍वासनलिकेत सोडून अडकलेला चुंबक यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. चुंबक चुंबकाकडे आकर्षला जातो. त्यामुळे मुलीला कसलीही इजा झाली नाही. शस्त्रक्रिया करताना मुलीने संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे तिला दुसर्‍याच दिवशी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.