Mon, Aug 19, 2019 10:05होमपेज › Belgaon › विजेचा खेळखंडोबा, शेतकर्‍यांचा शिमगा

विजेचा खेळखंडोबा, शेतकर्‍यांचा शिमगा

Published On: Mar 05 2018 9:07PM | Last Updated: Mar 05 2018 9:07PMबेळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण भागात हेस्कॉमकडून खेळखंडोबा सुरू आहे. कमी दाबाबरोबरच अनियमित स्वरुपाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे त्रस्त बनलेल्या शेतकर्‍यांनी  हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

खरीप व रब्बी हंगामानंतर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकर्‍यांकडून प्रामुख्याने भाजीपाला आणि ऊस पीक घेतले जाते. यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शेतकर्‍यांना आर्थिक आधार देणारी ही पिके असल्याने शेतकरीवर्ग सतर्क असतो. त्यांच्याकडून वेळेवर पाणी देण्याचा प्रयत्न होतो. मात्र हेस्कॉमने अनियमितपणे वीजपुरवठा सुरू केला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

कुद्रेमानी परिसरात तालुक्यात सर्वाधिक वीज मोटारी आहेत. मात्र वीजपुरवठ्याच्या नावाने खेळखंडोबा सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कमी दाबाचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे मोटारी सुरू होणे अवघड बाब बनली आहे. 440 व्होल्ट थ्रीफेज विजेच्या ठिकाणी 200 ते 220 व्होल्ट इतका कमीदाबाचा वीजपुरवठा होत आहे. यामुळे मोटारी जळण्याच्या घटना वाढत आहेत. शेतकर्‍यांना मोटारी दुरुस्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

एकीकडे वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी झपाट्याने घटत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी मिळविण्यासाठी यातायात करावी लागत आहे. पश्चिम भागात असणार्‍या मार्कंडेय नदीने तळ गाठला आहे. काही ठिकाणी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे विहीर, कूपनलिकांमधील पाणी मिळविण्यासाठी विजेअभावी शेतकर्‍यांना झगडावे लागत आहे. 

सध्या ग्रामीण भागातील बहुतांश भागात निरंतर ज्योती योजना सुरू आहे. यामुळे थ्रीफेज वीजपुरवठा ठरावीक काळात केला जातो. परिणामी रात्री-अपरात्री शेतकर्‍यांना शेतावर जावे लागते. मात्र वीज अनियमित असून वारंवार बंद करण्यात येते.