Fri, Jul 19, 2019 15:46होमपेज › Belgaon › बसवन कुडची मराठी शाळेला गळती

बसवन कुडची मराठी शाळेला गळती

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 8:22PMबेळगाव : प्रतिनिधी

बसवन कुडचीत सरकारी मराठी शाळेच्या इमारतीला यंदा 66 वर्षे पूर्ण झाली असून ती एका बाजूने ढासळत चालली आहे. दि.13 रोजी सकाळी स्लॅबमधून गळती लागल्याने व भिंतीना तडे गेल्याने पहिली व दुसरीच्या मुलांना अन्य वर्गात हलविण्यात आले. बसवन कुडची गावात सरकारी मराठी उच्च प्राथमिक मुलांची शाळा आहे. शाळेची इमारत 1952 मध्ये उभारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून ही इमारत ढासळत चालली आहे. स्लॅब, कॉलमला तडे गेले असून बाजूच्या भिंतीदेखील खचत चालल्या आहेत. त्यामुळे या शाळेत शिकणार्‍या 120 मुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

एकूण सहा वर्ग असून नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये दोन वर्ग चालविण्यात येतात. सगळ्या सहा वर्गात गळती लागली असून स्लॅब, व कॉलमधून वर्गात पाणी येत आहे. इमारतीमधील पहिलीच्या वर्गात जास्त पाणी व स्लॅबचे काँक्रिट ढासळत असल्याचे शाळा सुधारणा समिती सदस्य बसवंत मुतगेकर यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या नजरेला आणून दिला. शिक्षकांनी या वर्गातील मुलांना तिसरीच्या वर्गात हलविले. पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शाळा चालविण्यात येत आहे. चौथी ते पाचवीचा वर्ग शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत भरविण्यात आले आहेत. 

दुसरी स्वतंत्र दोन वर्गाची शाळा गावात आहे. मात्र, त्या ठिकाणी सहावी व सातवीचे वर्ग चालविण्यात येतात. त्यामुळे पहिली व दुसरीच्या मुलांना कोठे बसवावे, हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. गतवर्षी शाळा सुधारणा समिती व शिक्षकांनी माजी आमदार फिरोज शेठ यांना शाळेच्या इमारतीच्या पडझडीबद्दल माहिती दिली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, इमारत दुरुस्तीबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत, अशी तक्रार करण्यात येत आहे.