Wed, May 22, 2019 22:42होमपेज › Belgaon › बेळगावची सुव्यवस्थाच धाब्यावर!

बेळगावची सुव्यवस्थाच धाब्यावर!

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:27PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या महिनाभराच्या काळात बेळगाव शहरातील कायदा सुव्यवस्थाच धाब्यावर बसविण्यात आली आहे. नोव्हेंंबरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान खडक गल्ली परिसरातील जातीय दंगल उसळली होती. त्यानंतर या महिन्यात गुन्हेगारीच्या पाच गंभीर घटना घडल्या आहेत.  गुन्हेगारांनी खाकीला पूर्णपणे शह दिल्याचे दिसून येत असून सर्वसामान्य जनतेची सुरक्षा धोक्यात आली आहे. वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिस खात्याच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

गरिबांचे महाबळेश्‍वर बेळगाव शहर गेल्या काही वर्षांत क्राईमसिटी म्हणून ओळखण्यात येत आहे.   गेल्या काही वर्षांत बेळगाव परिसरात घडलेल्या अनेक गुन्हेगारी घटनांचा उलगडा करण्यात पोलिस खात्याला  अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे गुन्हेगारांचे फावले आहे.

बेळगाव शहराला जातीय तणावाचे ग्रहण लागले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना खडक गल्ली संवेदनशील भागात दंगल उसळली. समाजकंटकांनी पोलिस बंदोबस्ताला शह देत तुफान दगडफेक केली. अनेक वाहनांची नासधूस करण्यात आली. या दंगलीची अधिवेशनात गरमागरम चर्चा झाली. पोलिस खात्यावर टीकेची झोड उडाली. तरीही बेळगावचे पोलिस खाते सुस्तच राहिले. 

गेल्या महिन्यात झालेल्या जातीय दंगलीनंतर खाकीने धडा घेतला नाही. परिणामी या महिन्याच्या 3 तारखेला अळवण गल्ली आणि कसाई गल्ली परिसरात जातीय तणाव उसळला. एकाच रात्रीत शहरातील दोन ठिकाणी समाजकंटकांनी धुमाकूळ घातला.  

अळवण गल्ली  व कसाई  गल्ली येथे घडलेल्या जातीय तणावाच्या घटनेच्या आदल्या दिवशी दि. 2 डिसेंबरला काकतीनजीकच्या जंगलात अबकारी पोलिस व गावठी दारु विक्रेत्यांत संघर्ष झाला. युवकाच्या मृत्यूवरून त्या भागातील काहींनी अबकारी कार्यालयावर चाल केली सरकारी वाहनांची नासधूस केली.  मात्र, पोलिस खात्याने यावेळीही मौनीबाबाची भूमिका पार पाडली. 

दि. 4 डिसेंबर रोजी रात्री आझादनगर येथे तुमकूरच्या फूल व्यापार्‍याची लूट करण्यात आली. त्या व्यापार्‍याकडील 24 लाखांची रक्‍कम चोरट्यांनी लांबविली.  6 डिसेंबरला मध्यवर्ती परिसरातील समादेवी गल्लीतील हरी मंदिरात चोरट्यांनी चांदीचे पूजेचे साहित्य लंपास केले. त्यानंतर बेळगावातून सौदीला नोकरीच्या आमिषाने एका महिलेची विक्री केल्याची घटना उघडकीस आली. दि. 7 रोजी वर्दळीच्या हुतात्मा चौकाजवळील बोळात रात्री मतिमंद युवतीवर बलात्काराचा  प्रयत्न झाला.   त्याचबरोबर दि. 8 रोजी मध्यरात्री हॉटेल बंद करुन घराकडे निघालेल्या अक्षय चंद्रकांत जोशी यांना संचयनी चौकात चोरट्याने मारहाण करुन त्यांच्याकडील रक्‍कम लंपास केली. असाच प्रकार याच दिवशी घडला असून यामध्ये दैनिकात काम करणार्‍या कर्मचार्‍याला लुटण्याची घटना घडली आहे. 

गेल्या सप्ताहभरात  शहर परिसरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांकडे नजर टाकल्यास स्मार्टसिटीतील पोलिसांच्या  कामगिरीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असताना पोलिस खाते टीकेचे लक्ष बनले आहेत.  पोलिस खात्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या बीट व्यवस्थेच्या विश्‍वासाला तडा गेला आहे. पोलिस आणि गुन्हेगारात साटेलोटे असल्याचा दाट संशय व्यक्‍त होत आहे.