होमपेज › Belgaon › मरणाआधीच तिचा तिरडीवरुन प्रवास

मरणाआधीच तिचा तिरडीवरुन प्रवास

Published On: Aug 18 2018 1:34AM | Last Updated: Aug 18 2018 1:34AMखानापूर(बेळगाव) : वासुदेव चौगुले 

वर्षभरापासून ती एका दुर्धर आजाराने त्रस्त आहे. दवाखाने झाले. सर्व प्रकारचे उपचार केले. पण तरीही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे ती सध्या मृत्यूची वाट पाहत आहे. तीने अखेरचा श्वास आपल्या घरात घ्यावा. ही कुटुंबियांची इच्छा होती. मात्र गावापर्यंत वाहन जाण्याची सोय नसल्याने चक्क जीवंतपणीच तिरडीवरुन तिला घरी नेण्यात आले. 

वर्षभरापासून शांताचे जगणे कॅन्सर रोगामुळे नकोसे झाले आहे. सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले. मात्र सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनीही हात टेकले. शांताचा पती ग्राम सहाय्यक म्हणून काम करतो. तर दोन मुलगे पाचवी व दुसऱ्या इयत्तेत गावातीलच शाळेत शिकत आहेत.

शांता वर्षभर दवाखान्यातच आहे. अखेरचे काही दिवस तरी मुलांना आईची सोबत मिळावी. म्हणून बुधवारी सकाळी तिला बेळगावहून खानापूरला आणण्यात आले. हेम्माडगा गावापर्यंत खाजगी वाहनातून पोहोचल्यावर तेथुन वनविभागाच्या जीपमधून तळेवाडी गावापर्यंत नेण्यात आले. मात्र तेथून पुढे बिकट वाट असल्याने जीप पुढे जाणे अशक्य होते.

अखेरीस गावातून आठ दहा तरुणांना बोलाऊन घेण्यात आले.  घोंगड्याची तिरडी करून त्यावरून तिला तब्बल आठ कि. मी अंतर खांद्यावरून नेण्यात आले. रस्ता व संपर्काअभावी आयुष्यभर जीवंतपणीच मरण यातना भोगणाऱ्या गवाळी वासियांना मरणाआधीचा प्रवासही तिरडीवरुनच करावा लागतो. हे चकचकीत खानापूरच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना कधी दिसणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.