Wed, Mar 27, 2019 01:56होमपेज › Belgaon › घरबसल्या मिळणार आता 7/12

घरबसल्या मिळणार आता 7/12

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अनेक योजनांसाठी सातबारा उतारा आवश्यक असल्यामुळे शेतकर्‍यांना धावपळ करावी लागते. नव्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमुळे या अडचणी कमी होणार आहेत. शेतकर्‍यांना आता घरबसल्या सातबारा उतारा मिळविणे शक्य होणार आहे. 

शेतकर्‍यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतार्‍याची आवश्यकता असते. यामुळे नाडकचेरी, तहसील कार्यालय आदी ठिकाणी उतारा मिळविण्यासाठी गर्दी होत असते. त्या ठिकाणी दिवसभर तिष्ठत थांबावे लागते. त्वरित उतारा आवश्यक असल्यास अधिकारी अथवा कर्मचार्‍यांना लाच द्यावी लागते. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक लूट होते.
शेतकरीहितासाठी महसूल खात्याने नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानुसार सायबर कॅफे अथवा घरबसल्या मोबाईलच्या साहाय्याने सातबारा उतारा मिळविणे शक्य होईल. 

राज्यात दरवर्षी 200 तालुका आणि 800 नाडकचेरीतून 3 कोटीहून अधिक सातबारा उतारे काढण्यात येतात. एका काऊंटरमधून दररोज सरासरी 125 उतारे देण्यात येतात. यासाठी प्रवासासह 70 ते 165 रु. खर्च करावा लागतो. मात्र नव्या उपक्रमामुळे केवळ 10 रुपयामध्ये उतारा मिळेल.
शेतकर्‍यांना सातबारा आवश्यक

विविध सरकारी योजनांसाठी सातबारा उतारा सक्तीचा करण्यात आला आहे. कृषी कर्ज, सवलती, बियाणे, पीकविमा आदीसाठी सातबाराची मागणी करण्यात येते.  शेतकर्‍यांना तो मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागते. 

यावेळी ऑनलाईन उतारा पद्धत फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये सर्वे क्रमांक, जमिनीचा प्रकार, जलस्रोत, जमीन मालक व हिस्सेदार आदींची नोंद असते. हा सातबारा शेतकर्‍यांना सुलभपणे मिळणार आहे.


  •