Sat, Apr 20, 2019 16:17होमपेज › Belgaon › नियोजनाअभावी पाणीयोजना कुचकामी

नियोजनाअभावी पाणीयोजना कुचकामी

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 10:53PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यातच तालुक्यातील ग्राम पंचायतकडून सदोष पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य  निर्माण झाले आहे. परिणामी पाणी मिळविण्यासाठी महिलांना धावाधाव करावी लागत आहे.

ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जि. पं. कडून प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करण्यात येतो. यातून कूपनलिका, विहिरी, स्वजल पाणीपुरवठा योजना, बहुग्राम पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. मात्र सार्‍याच योजना कुचकामी ठरल्या असून ग्रामीण भागात पाण्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केल्याचे दिसून येत आहे. आगामी दोन महिने यामध्ये अधिक भर पडणार असून यामुळे नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

ग्रा. पं. कार्यक्षेत्रात कोणतीही मोठी नदी नसल्यामुळे पाणी मिळविण्यासाठी कूपनलिका व विहिरीवर अवलंबून राहावे लागते. पूर्वभागातील काही गावांना शिरून धरणातून पाणी पुरवण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार मुचंडी, मुतगा, निजली, सांबरा परिसरात जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र सदर काम अद्याप पूर्णत्वाला गेलेले नाही. याचपरिसरातील काही गावांना हिडकल धरणातून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु, याची पूर्तता झालेली नाही. यामुळे पाण्याची समस्या कायम राहिली आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात पूर्व भागाच्या तुलनेत अधिक पावसाचे प्रमाण आहे. मात्र बारमाही वाहणार्‍या नदीची वाणवा आहेे. या भागातून वाहणारी मार्कंडेय नदी फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडते. परिणामी पाणीसमस्या या भागातील नागरिकांची डोकेदुखी बनून राहिली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे नवीन योजना राबविताना अडचण निर्माण होणार आहे. कोनेवाडी, बसुर्ते, तुरमुरी, कुद्रेमानी, उचगाव, आंबेवाडी, मण्णूर परिसरात पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. यामुळे पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करत आहे.