Wed, Nov 21, 2018 07:36होमपेज › Belgaon › आई-वडिलांना वृद्धाश्रमात डांबणार नाही

आई-वडिलांना वृद्धाश्रमात डांबणार नाही

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 10:31PMबेळगाव : प्रतिनिधी

समाजात पदवीधारकांची संख्या वाढत आहे तसतसे वृद्धाश्रमही वाढत आहेत. उच्च शिक्षितांच्या पदव्या वाढत असताना संवेदनशील मने हरवत चालली आहेत, असे सांगून गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी स्नातकांकडून स्वत:च्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात डांबणार नाही, असे वचन घेतल्याने उपस्थित सारेच भारावले.

निमित्त होते येथील केएलई अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या आठव्या पदवीदान समारंभाचे. मंगळवारी हा सोहळा पार पडला. राज्यपाल सिन्हा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे कुलगुरु खा. डॉ. प्रभाकर कोरे होते. उपकुलगुरु प्रा. डॉ. विवेक सावजी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेचे सर्व विभागप्रमुख होते.

राज्यपाल सिन्हा म्हणाल्या, सध्याची आई नोकरी, व्यवसाय करताना पैशाच्या मागे धावत आहे. यामुळे पोटच्या गोळ्याकडे लक्ष द्यायला तिला पाच मिनिटेही वेळ काढता येत नाही. अलीकडे गर्भसंस्कारांचा विसर होत चालल्याने सामाजिक संवेदनशीलता हरवत चालली आहे. प्रत्येक मानवावर पहिले संस्कार होतात ते गर्भसंस्कार. पण हल्‍ली आईची व्याख्या बदलत असल्याने सध्याचे चित्र विदारक झाले आहे. ज्यांनी ज्यांनी गळ्यात पदके मिरवली, त्याला सामाजिक संवेदना हेही एक आभूषण आहे, याची जाण ठेवावी. काही ना काही समाजसेवा करा. त्याग जाणा. जीवनातील अंतिम ईप्सित साध्य करताना सामाजिक भान कायम ठेवायला हवे. कोणत्याही सामाजिक कारणासाठी वयाचा आणि वेळेचा विचार करू नका. संकुचित बनू नका. नेटके नियोजन करून यशाला गवसणी घाला.
एकूण 51 स्नातकांना राज्यपाल सिन्हा, खा. कोरे यांच्या हस्ते पदव्या बहाल करण्यात आल्या. प्रा. डॉ. सावजी यांनी संस्थेचा आढावा घेतला.

डॉ. स्मिता मल्‍लिकार्जुन पाटील, डॉ. सम्राट शहा, डॉ. विजयालक्ष्मी चिकमठ या तिघा तीन-तीन  सुवर्णपदक  विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला.