होमपेज › Belgaon › साहित्यिकांच्या हत्येचे धागेदोरे खानापुरात?

साहित्यिकांच्या हत्येचे धागेदोरे खानापुरात?

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:43PMखानापूर : वार्ताहर

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पद्मावत चित्रपटावरून सर्वत्र   आगडोंब उसळला. बेळगावातही एका चित्रपटगृहात चित्रपट सूरू असताना पेट्रोल बाँब फेकण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी  काही दिवसांपूर्वी  खानापुरातून एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून महत्त्वाचे  धागेदोरे तसेच साहित्यिकांच्या हत्येबाबतची माहिती पुढे अल्याची चर्चा आहे.

हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे असून अधिकारी अन्य संशयितांच्या मागावर आहेत. खानापुरातून काही युवक फरार झाले असल्याने संशय बळावत चालला आहे. ज्येष्ठ पुरोगामी लेखक तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्याच विचारसरणीचे गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. सीआयडीकडे तपास असताना काही निष्पन्न झाले नसल्याने सध्या चारही प्रकरणांचा तपास सीबीआयकडे आहे. 

यामुळे पेट्रोल बाँब प्रकरण आणि काहींचे अचानक फरार होणे, याबाबत सीबीआयच्या पथकाने नुकताच खानापुरातील काही ठिकाणी  तपास सुरू ठेवला असल्याचे समजते. या सर्व प्रकरणी राज्याच्या सर्व तपास यंत्रणा तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याकडे गांभीर्याने  लक्ष केंद्रित केल्याने महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.