Mon, May 27, 2019 09:23होमपेज › Belgaon › खानापूरच्या राजकारणात होणार उलथापालथ

खानापूरच्या राजकारणात होणार उलथापालथ

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 05 2017 9:42PM

बुकमार्क करा

बेळगाव : महेश पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खानापूर तालुक्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. म. ए. समितीचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर मतदारसंघात भाजप आणि निधर्मी जनता दलात उमेदवारीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.  विद्यमान आ. अरविंद पाटील, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, माजी सभापती सुरेश देसाई, निवेदीत अल्वा, वल्लभ गुणाजी, मंजुळा कापसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी आलेल्या हिंदुत्ववादी लाटेत एकवेळ भाजपने समितीचा हा गड आपल्या ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर पुन्हा समितीने या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले. सद्य:स्थिती पाहता समितीला हा बालेकिल्ला राखताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

म. ए. समितीचे विद्यमान आ. अरविंद पाटील यांनी पुन्हा आमदारकीचा आग्रह धरला आहे.  त्यांचे पाठिराख्यांचे आणि कार्यकत्यार्ंंचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे.  खानापूर तालुका म. ए. समितीचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर पाटील यांच्या नियुक्तीला त्यांनी आक्षेप घेतलेला असल्याने ही विरोधाची धार वाढत जाणार आहे, यात शंका नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी निवडणुकीत माजी अध्यक्ष व माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर यांनाच समितीमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी प्रचारासही प्रारंभ केला आहे.

भाजपमध्येही माजी आ. प्रल्हाद रेमाणी, सामाजिक कार्यकर्ते व भाजप किसान मोर्चाचे वल्लभ गुणाजी, बाबुराव देसाई, मंजुळा कापसे, धनश्री सरदेसाई, संजय कुबल यांची नावे चर्चेत आहेत. मात्र अंतिम निर्णय केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडेेच घेणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा ना. हेगडे यांच्याकडे लागल्या आहेत.  वल्लभ गुणाजी यांना श्रीरामसेना व अन्य हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे. काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये घालमेल आहे. रफिक खानापुरी, नासीर बागवान यांच्यासह अंजलीताई निंबाळकर इच्छुक आहेत. कर्नाटक कोकणपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांचे सुपुत्र निवेदित यांचे नावही आघाडीवर येत आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्याने कदाचित दुफळी टाळण्यासाठी निवेदित यांनाही संधी मिळू शकते. त्यांचा खानापूर तालुक्यात चांगला संपर्क आहे. मार्गारेट खासदार असताना त्यांनी विविध कामे राबवली आहेत. निजदमधून अ‍ॅड. एच. एन. देसाई, नंदगडचे राऊत यांची नावे चर्चेत आहेत.