Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Belgaon › ...मग सीमाप्रश्‍नाबाबतच सापत्नभाव का?

...मग सीमाप्रश्‍नाबाबतच सापत्नभाव का?

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:12AM

बुकमार्क करा

खानापूरःप्रतिनिधी

म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाकडे प्रकरण प्रलंबित असताना न्यायालयाच्या कक्षेबाहेर सामोपचार आणि सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चेने याप्रश्‍नी तोडगा काढण्याची विनवणी सातत्याने कर्नाटकातील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्राने चर्चेद्वारे प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली तेव्हा कर्नाटकाने मौनीबाबाची भूमिका घेतली, अशा प्रतिक्रिया आता सीमाभागातील जनतेतून ऐकायला मिळत आहेत.

गुजरातेत अपेक्षित प्रमाणात यश न मिळाल्याने तेथील उणीव भरुन काढण्यासाढी आता कर्नाटकच्या मोर्चेबांधणीसाठी दिल्लीतील भाजप नेतृत्वाने कंबर कसली आहे. त्यासाठी आल्या-आल्या अकारण म्हादई जलतंट्यात उडी घेतली आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या मध्यस्तीने दिल्लीत झालेल्या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांना न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी कर्नाटकला सहकार्य करा, असे फर्मान बजावले. यासंदर्भात दि. 20 डिसेंबर रोजी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. बी. एस. येडियुराप्पा यांनी पर्रिकर यांना पत्र पाठवून सहकार्याची मागणी केली. लागलीच दि. 21  रोजी पर्रिकर यांनी येडियुराप्पांना उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रात पिण्यासाठी पाणी देण्याकरिता सकारात्मक चर्चेची गोव्याची तयारी असल्याचे सांगितले. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून आणि सौजन्याचा भाग म्हणून चर्चेसाठी आपली तयारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. यासह दुष्काळामुळे होरपळणार्‍या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण चर्चेला तयार असून जललवादाकडे गोव्याने मांडलेल्या मागण्या आणि हक्कांचेही योग्य संरक्षण व्हावे, अशी अपेक्षा केली आहे.

असे असले तरी कर्नाटकाचा कोणत्याही राज्यासोबतच्या वादाचा आजपर्यंतचा इतिहास चाळला असता बेभरवशाच्या राजकारणाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. 60 वषार्ंपासून प्रलंबित असलेल्या  सीमाप्रश्‍नाबाबत कित्येकदा महाराष्ट्राने चर्चेसाठी पायघड्या घातल्याचा इतिहास साक्ष आहे. मात्र, प्रत्येकवेळी काहीतरी कारण पुढे करुन चर्चेला बगल देण्याचा प्रघात कर्नाटकाने पाडला. कर्नाटकात सरकार कोणाचेही असो म्हादईप्रश्‍नी पक्षभेद विसरुन सगळे एकत्र येतात. 

आजघडीला भाजपने म्हादईप्रश्‍नी घेतलेल्या पुढाकाराला अन्य पक्षीयांनी गप्प राहून जणू मूक संमतीच दिली आहे.  यापूर्वी अन्य राज्यांना कर्नाटकसंदर्भात आलेले अनुभव पाहता गोवा सरकारने चर्चेची तयारी दर्शविताना कर्नाटकवरील उपकार भविष्यात गोवेकरांना महागात पडणार तर नाहीत ना,  याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.