Sun, Mar 24, 2019 17:18होमपेज › Belgaon › अपघातात बाप-लेकीसह तिघे ठार

अपघातात बाप-लेकीसह तिघे ठार

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 11:16PMखानापूर : प्रतिनिधी

ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्‍या बसला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील तिघे ठार झाले. मृतांमध्ये बाप-लेकीसह चुलत काका ठार. या अपघातामुळे गुंजी, मुंडवाड आणि सावरगाळी येथील माकडमारी तांड्यावर शोककळा पसरली आहे. बाबाजी ऊर्फ शाम आत्माराम पवार (वय 30), त्याची मुलगी गजनी शाम पवार (वय 6) व सुळकर परशराम पवार (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

शनिवारी सायंकाळी बाजार करुन साडेसहाच्या सुमारास हे तिघे दुचाकीवरुन गुंजीला जात होते. माणिकवाडीनजीच्या चढावाला दुचाकीचालक शामने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरुन येणार्‍या कर्नाटक परिवहनच्या बसला जोरदार धडक बसल्याने शाम व गजनी दोघेही उडून रस्त्यावर पडलेे. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने रक्‍तस्त्राव होऊन काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.  सुळकर यालाही बसची धडक बसल्याने गंभीर अवस्थेत दवाखान्यात नेताना वाटेतच त्याने प्राण सोडला.

पवार कुटुंबीय जातीने माकडमारी असले तरी वनखात्याच्या निर्बंधांमुळे माकडमारी न करता परिसरात मोलमजुरी  करुन उदरनिर्वाह करतात. तीन वर्षांपूर्वी गजनीच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तिचा सांभाळ वडील व आजी करत होते. मुंडवाड येथे राहणार्‍या शाम पवार याने पत्नीच्या निधनानंतर कामासाठी गुंजी येथे बस्तान हलविले. तेथील नातेवाईकांकडे तो मुलीसोबत मिळेल ते काम करुन गुजरान करत होता. सध्या मुंडवाड परिसरातील अनेकांनी कामानिमित्त सावरगाळी आणि गुंजी परिसरात वास्तव्य केले आहे. त्यामुळे तिघाही मृतांवर सावरगाळी येथील जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले. आधी सुनेला गमाविलेल्या शामच्या आईने शनिवारच्या अपघातात मुलगा व एकुलत्या नातीलाही गमाविल्याने तिचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता. 

संसार ठरला औटघटकेचा
अपघातात मयत झालेल्या शाम पवार याचा 15 दिवसांपूर्वी पुर्नविवाह झाला होता. सावरगाळी येथील विधवा तरुणीशी त्याचा विवाह लावून देण्यात आला होता. मात्र काळाने अवघ्या 15 दिवसातच त्याच्यावर घाला घातल्याने नवविवाहिता भागिरथीचा संसार औटघटकेचा ठरला.