Sun, May 26, 2019 15:35होमपेज › Belgaon › वीट मजुरांच्या हातांना आला यंत्रांचा वेग !

वीट मजुरांच्या हातांना आला यंत्रांचा वेग !

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 9:31PM

बुकमार्क करा

खानापूर : वासुदेव चौगुले

पंधरा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे चिंतातूर झालेल्या वीट मजुरांना मोकळ्या आकाशामुळे मोठा दिलासा मिळाला असून जोमाने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी उत्पादनास लवकर सुरुवात केलेल्या उत्पादकांनी वीटभट्टी लावण्याच्या कामालाही प्रारंभ केला आहे. सध्या विटांना चांगला दर आहे. त्यामुळे जादा दराची ही संधी कॅश करण्यासाठी सर्वत्र वीटभट्टी लावण्याची जोरदार धांदल सुरु झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात शेतीनंतरचा दुय्यम व्यवसाय म्हणून वीट उत्पादनाकडे बघितले जाते. व्यापारी शेतीला पुरेसा वाव नसल्याने भात उत्पादन घेतल्यानंतर तालुक्यातील शेतमजूर विटांच्या उत्पादनास प्रारंभ करतो. त्यामुळे सुगीची कामे आटोपताच जो-तो वीट व्यवसायाच्या तयारीला लागतो. त्यासाठी मातीची साठवणूक करणे, बाहेरील मजुरांना आणणे, पाण्याची व निवार्‍याची सोय करणे या कामांना जोर येतो.

पूर्व व अतिदुर्गम पश्‍चिम भागाचा अपवाद वगळता बहुतांश सर्वच गावांमध्ये वीट उत्पादनाचा व्यवसाय केला जातो. त्यातही हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, गणेबैल, माळअंकले, झाडअंकले, इदलहोंड, सिंगिनकोप, निट्टूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, सन्नहोसूर, निडगल, हलकर्णी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड या भागातील विटांना चांगली मागणी असल्याने दरवर्षी हजारो कामगार थंडीची तमा न बाळगता जोमाने उत्पादनास सुरुवात करतात.

मध्यंतरीच्या काळात बांधकाम व्यवसायात मंदीची लाट निर्माण झाल्याने विटांचे दर पडले होते. मात्र सावकाश परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पुन्हा विटांना समाधानकारक दर मिळू लागला आहे. खानापूरच्या विटांना हुबळी, धारवाड, बेळगावासह महाराष्ट्रातही मोठी मागणी आहे. गेल्यावर्षी भाजलेल्या जुन्या विटांना तुलनेने अधिक दर मिळत आहे. उत्तम प्रतिच्या जुन्या विटांना सध्या 4 हजार 200 ते 4 हजार 500 रु.  तर नव्या विटांना 200 ते 400 रु. कमी दर मिळत आहे.

कडाक्याच्या थंडीचा सामना करत दररोज प्रतिमजूर हजार ते दीड हजार कच्च्या विटांचे उत्पादन करण्यासाठी धडपडत आहे. तर वीटभट्टी भाजण्यासाठी आवश्यक असलेल्या लाकूड व भाताची पोल या साहित्याच्या जमवाजमवीत वीट कंत्राटदार व्यस्त झाले आहेत. अवकाळीच्या भीतीने धिम्यागतीने यंदा विट उत्पादनास सुरुवात झाली खरी मात्र आता सर्वत्र शिवारांमध्ये वीट मजुरांचा गलबलाट वाढू लागला असून उत्पादनानेही गती घेतली आहे.