Wed, Apr 24, 2019 00:18होमपेज › Belgaon › कावेरी पाणी : तमिळनाडूला ४ टीएमसी पाणी देण्याची सूचना

कावेरी पाणी : तमिळनाडूला ४ टीएमसी पाणी देण्याची सूचना

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:11AMबंगळूर : प्रतिनिधी

कावेरी पाणी वाटपासाठी योजना तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेली मुदत गुरूवार दि. 3 रोजी संपुष्टात आली. त्यामुळे तमिळनाडूला 4 टीएमसी पाणी देण्याची सूचना न्यायालयाने कर्नाटकाला दिली. एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यात प्रत्येकी चार टीएमसी पाणी देण्याचे न्यायालयाने सुनावले आहे.

कावेरी पाणी वाटपासाठी योजना आखण्याची मागणी तमिळनाडूने काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 8 मेपूर्वी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना दिली आहे. यावेळी युक्तिवाद मांडताना केंद्र सरकारचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी कावेरी देखरेख मंडळ स्थापन करण्यासाठी तयारी झाल्याचे सांगितले. कर्नाटकात विधानसभा निवडणुका असून आचारसंहितेमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले. यावर न्यायमूर्तींनी 8 मेपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगून त्या दिवसापर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

कावेरी पाणी वाटपासाठी योजना तयार करण्याविषयीच्या तमिळनाडूने सादर केलेल्या याचिकेवर 16 फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. सहा आठवड्यांत योजना तयार करण्याची सूचना न्यायालयाने दिली होती. ही मुदत 9 एप्रिलला संपली. त्यानंतर केंद्राने आणखी तीन महिन्यांची मुदत त्याकरिता मागितली. शिवाय योजनेच्या कार्यकक्षेबाबत स्पष्ट करण्याचे सांगितले. मात्र, न्यायमूर्तींनी केंद्र सरकारला नकार दिला. 3 मे पर्यंत योजना तयार करण्याची ताकीद दिली. आता आचारसंहितेचे कारण पुढे करून आणखी दोन आठवड्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केंद्र करत आहे.