होमपेज › Belgaon › कारवार जिल्ह्यातील गावांत समुद्राचे पाणी

कारवार जिल्ह्यातील गावांत समुद्राचे पाणी

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:27AM

बुकमार्क करा

कारवार : प्रतिनिधी  

पश्‍चिम किनारपट्टीवर निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे  केरळ, तामिळनाडूबरोबर आता उत्तर कर्नाटकातील कारवार जिल्ह्यावरही परिणाम दिसून येत आहे. भटकळ, होन्नावर, कुमठा, अंकोला व कारवार तालुक्यातील किनारपट्टीवरील वातावरणात सोमवारपासून बदल झाला आहे.  या पाच तालुक्यांतून मच्छीमारी बंद ठेवण्याचे हवामान खात्याने केल्याने दोन दिवसांपासून मच्छीमारी बंद आहे. आणखी तीन बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश हवामान खात्याने दिले आहेत.

अरबी समुद्रालगतच्या तुप्पलकेरी, बंडारकेरी या गावांमध्ये समुद्राच्या लाटा लोकवस्तीत थडकल्याचे वृत्त आहे. काही मच्छीमारांच्या घरामध्ये समुद्राचे पाणी शिरले आले. मात्र, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. येथील नागरिक मात्र भीतीच्या छायेखाली आहेत. कुमठा येथे समुद्राच्या मोठ्या लाटा निर्माण होत असून समुद्राकाठच्या घरांमधील रहिवाशांत  भीती व चिंतेचे वातावरण आहे. अंकोला तालुक्यातील मंजगणी, बेळंभाट येथे सोमवारी रात्री समुद्राच्या लाटांनी कहर माजविला होता. सुदैवाने लाटा घरांपर्यंत पोहोचल्या नाहीत, त्यामुळे अनर्थ टळल्याचे येथील मच्छीमारांनी सांगितले. कारवार शहरात मंगळवारी सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.