Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Belgaon › बंडखोरी, त्यातही उमेदवार ‘पडेल’

बंडखोरी, त्यातही उमेदवार ‘पडेल’

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:00AMबेळगाव : प्रतिनिधी

यंदाच्या निवडणुकीत जनमत आजमावून उमेदवाराची निवड व्हावी, पडेल म्हणजे पराभूत नेत्यांना पुन्हा संधी देऊ नये, असे निकष लागू करणार्‍यांनीच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीशी बंडखोरी केली आहे. शिवाय स्वतःचा  उमेदवार निवडताना याच निकषांना बाजूला ठेऊन पराभूत नेत्याला उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळेच या  उमेदवाराला प्रचारदरम्यान विरोध होत आहे.

2008 मध्ये दक्षिण मतदार संघातून काँग्रेसमधून सध्याचे म. ए. समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी  म. ए. समितीतर्फे किरण सायनाक यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती; पण 2008 मध्ये अभय पाटील निवडून आले. दक्षिण मतदारसंघात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असूनही समितीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी दीपक दळवी यांनीही किरण सायनाक यांच्या उमेदवारीला पसंती दिली होती. तरीही सायनाक पराभूत झाले. त्याच सायनाकांना आता बंडखोर गटाने आपला उमेदवार घोषित केले 

आहे. त्यामुळेच एक तर बंडखोरी केली, त्यातही पराभूत नेत्याला संधी कशी दिली, असा प्रश्‍न मराठी भाषिक विचारत आहेत. स्वतः बनवलेलेच नियम का मोडले, असाही प्रश्‍न विचारला जात आहे. मध्यवर्तीतर्फे नवीन चेहरा म्हणून प्रकाश मरगाळे यांची उमेदवारी जाहीर केली असताना, पुन्हा पडेल उमेदवार सायनाकांना निवडणुकीच्या रिंगणात का उतरवले, असाही प्रश्‍न विचारला जात आहे.