Thu, Jan 30, 2020 00:31होमपेज › Belgaon › बंडखोरांचा अपेक्षाभंग

बंडखोरांचा अपेक्षाभंग

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:31AMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्या नावावर बंडखोरी करणार्‍या उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला असून सुरेश हुंदरे स्मृतिमंचने मध्यवर्ती म. ए. समितीच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बंडखोरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची मागणी करण्यात येत आहे. हुंदरे मंचने एकीबाबत प्रयत्न सुरू ठेवले असताना एकी न झाल्यास  ‘नोटा’ला मतदानाचे आवाहन करावे, असा दबाव बंडखोरांनी मंचवर आणला होता, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला.

बेळगाव दक्षिणमधून प्रकाश मरगाळे, ग्रामीणमधून मनोहर किणेकर, खानापूरमधून आ. अरविंद पाटील यांची नावे मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे यांनी जाहीर केली. मध्यवर्ती म. ए. समितीने निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेल्या तिन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

स्मृतिमंचतर्फे म. ए. समितीच्या उमेदवारामध्ये एकी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही नेत्यांच्या प्रतिसादाअभावी एकी होऊ शकली नाही. यामुळे उपरोक्त निर्णय घेण्यात आला, असे पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

वीस दिवसांपासून म. ए. समितीमध्ये निर्माण झालेली बेकी मिटवण्याचा प्रयत्न स्मृतिमंचच्या माध्यमातून मराठी उद्योजक, डॉक्टर, वकील व समाजसेवकांनी केला; परंतु  काही जणांनी योग्य साथ दिली नाही. यामुळे शनिवारी अखेर स्मृतिमंचने रिंगणातील उमेदवारांचा अभ्यास करून आणि लढ्यातील योगदान लक्षात घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली.
एका मतदारसंघात समितीचे दोन-दोन उमेदवार उभे आहेत. त्यामुळे मराठी मतदार संभ्रमावस्थेत सापडले आहेत. मतदानाला केवळ आठ दिवसाचा अवधी शिल्लक असतानादेखील तोडगा निघू शकला नाही. यामुळे पूर्ण विवेकाने साधकबाधक विचार करून निर्णय घेतला आहे. उमेदवारांची सीमाप्रश्‍नाबाबतची आजवरची भूमिका, तळमळ, निष्ठा आणि त्यांनी केलेला त्याग याचा विचार करून निवड केली आहे. एकीसाठी स्मृतिमंचचे कार्यकर्ते राजेंद्र मुतकेकर, आर. एम. घाडी, प्रदिप मुरकुटे, माजी महापौर गोविंद राऊत, संजय मोरे आदीनी प्रयत्न केले.दरम्यान, स्मृतिमंचच्या निर्णयामुळे मराठी हितासाठी  बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी मराठी मतदारातून करण्यात येत आहे.  यासाठी येत्या काळात जनतेतून दबाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

विवेकाला साक्षी ठेवून

मराठी भाषा आणि संस्कृती यांच्या जोपासनेसाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सद्सद्विवेक बुद्धिला साक्ष ठेवून उमेदवारांची निवड केल्याचे सुरेश हुंदरे स्मृतिमंचने पत्रकात नमूद केले आहे.