Sun, Mar 24, 2019 16:45



होमपेज › Belgaon › कर्नाटकात काँटे की टक्कर

कर्नाटकात काँटे की टक्कर

Published On: May 13 2018 2:12AM | Last Updated: May 12 2018 11:29PM



बंगळूर : वृत्तसंस्था

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत आरोप-प्रत्यारोपाच्या तडक्याने लक्षवेधी ठरलेल्या आणि आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजप आणि निधर्मी जनता दलास (निजद) स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून (एक्झिट पोल) वर्तविण्यात आला आहे. बहुतांश वाहिन्यांनी काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.

112 : मॅजिक फिगर
सत्ता स्थापन करण्यासाठी 112 जागांची आवश्यकता आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल आणि  निजदचे सर्वेसर्वा, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र  किंगमेकरची भूमिका पार पाडतील, अशी शक्यताही या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. 15 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी शनिवारी चुरशीने 70 टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत 71 टक्के मतदान झाले होते. मतदान संपल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले. आज तक, टाईम्स नाऊ, इंडिया टुडे, सी व्होटर आदी वृत्तवाहिन्यांनी सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. काँग्रेसला 97 ते 118 पर्यंत जागा पटकावता येतील, तर भाजपला 90 ते 92 जागांवर समाधान मानावे लागेल, असे या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.   
रिपब्लिक, एबीपी, झी, सीएनएक्स या वृत्तवाहिन्यांनी भाजपला सर्वाधिक 95 ते 119 या दरम्यान, तर काँग्रेसला 73 ते 99 जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.