Tue, Jan 21, 2020 12:02होमपेज › Belgaon › कर्नाटकातील पेच आजही सुटणार नाही

कर्नाटकातील पेच आजही सुटणार नाही

Published On: Jul 19 2019 2:50PM | Last Updated: Jul 19 2019 6:32PM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात गेल्या १५ दिवसांपासून राजकीय घमासान सुरू आहे. आज, शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारला दिलेली डेडलाईन उलटली. ज्या पद्धतीने कुमारस्वामी यांचे सरकार ही प्रक्रिया ढकलत आहे त्यावरून असे दिसत आहे की सत्ताधारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान टाळत असल्याचे दिसत आहे. एचडी कुमारस्वामी यांना २४ तासांत  दुसऱ्यांना पत्र पाठवून  राज्यपाल गजुभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. 

अशा स्थितीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दोनवेळा विधानसभा सभागृहात संबोधित केले. सरकार वाचविण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या दिवसांपासून आमचे सरकार अस्थिर असून ते पडणार असल्याचे वातावरण तयार केले होते, असा आरोपही त्यांनी केला.

चौदा महिने सत्तेत राहिल्यानंतर आमचे सरकार आता निर्णायक स्थितीवर पोहोचले आहे. चला चर्चा करू. तुम्ही तरीही सरकार बनवू शकता. घाई कशाला? सोमवारी किंवा मंगळवारी सरकार बनवू शकता. मी सत्तेचा दुरुपयोग करून पुढे जाणार नाही, असे कुमारस्वामींनी सांगत एक प्रकारे बहुमत चाचणी घेण्याआधीच भाजपला सत्तास्थापनेसाठी अप्रत्यक्ष निमंत्रण दिले.   

काल, गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक मांडल्यानंतर दिवसभर सभागृहात हंगामा झाला. मात्र, विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले नाही. त्यानंतर विधानसभा सभापतींनी शुक्रवारपर्यंत कामकाज तहकूब केले. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा आणि अन्य भाजप आमदारांनी रात्रभर विधानसभा सभागृह सोडले नाही. विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याची मागणी करत भाजप आमदारांनी विधानसभेत रात्रभर धरणे धरले आणि सर्व आमदार सभागृहातच झोपले. भाजपचे आमदार प्रभू चव्हाण चक्क विधानसभेत बेडशीट आणि उशी घेऊनच आले आणि त्यांनी सभागृहातच रात्र घालविली. काही आमदारांनी सकाळी उठून विधानसभा परिसरात मॉर्निंग वॉकही केले.

आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा कायम राहिली.