Tue, Jul 23, 2019 16:40होमपेज › Belgaon › कॅसलरॉकला ढगफुटी

कॅसलरॉकला ढगफुटी

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:07AMबंगळूर : प्रतिनिधी

किनारपट्टी भागाला पावसाचा तडाखा कायम असून कारवार जिल्ह्यातील कॅसलरॉक येथे ढगफुटी झाली. 24 तासांत तब्बल 60 इंच पाऊस झाला असून देेशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आगुंबेमध्ये 56 इंच पाऊस झाला आहे. परिणामी किनारपट्टी परिसरात हुडहुडी भरली आहे.

किनारपट्टीवर पावसाचे आगमन 29 मे रोजीच झाले असून, सोमवारीही पावसाचा जोर कायम होता. कारवार, उडपी, चिक्‍कमंगळूर या किनारपट्टी जिल्ह्यांसह कोडगूमध्येही सोमवारी जोरदार पाऊस झाला. पश्‍चिम घाटातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या कॅसलरॉकमध्ये सोमवारी 24 तासांत 15 सें.मी. म्हणजेच तब्बल 60 इंच पाऊस कोसळला. परिणामी जनजीवन ठप्प झाले आहे. रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. कॅसलरॉकजवळ असलेला दूधसागर धबधबा प्रवाहित झाला आहे.

कोडगू जिल्ह्यातील भागमंडल परिसरात सोमवारी एका दिवसात तब्बल 68 इंच पाऊस नोंदला गेला आहे. राज्यातला हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर चिक्‍कमंगळूर जिल्ह्यातील आगुंबेमध्ये 24 तासात 56 इंच पाऊस झाला आहे. एकूणच पश्‍चिम घाट तसेच किनारपट्टी परिसर पावसाच्या तडाख्यात सापडला आहे.

राज्यभरात 104 बळी

यंदा मान्सूनपूर्व पाऊस तसेच मान्सूनमुळे राज्यभरात 104 जणांचा बळी गेला आहे. तर 337 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. अशी माहिती महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी बंगळूरमध्ये पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, एकूण 94 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर 10 लोक बुडून किंवा कोसळणार्‍या घरांखाली सापडून मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना घटना घडल्यापासून 48 तासांच्या आत 4 लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश दिला आहे. आतापर्यंत आपत्तग्रस्त कुटुंबांना 8 कोटी 63 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. भद्रा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असून हासन आणि कोडगू जिल्ह्यांना पुराचा धोका आहे. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शाळा सोमवारीही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

बेळगाव जिल्ह्यात 7 बळी

बेळगाव जिल्ह्यात सोमवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी मान्सून दाखल झाल्यापासून 7 लोकांचा बळी गेला आहे. तर 20 जनावरे ठार झाली आहेत. शिवाय 600 घरांची पडझड झाली आहे.