Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › काँग्रेसचा जाहीरनामा : विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, कृषी उत्पन्न दुप्पट

काँग्रेसचा जाहीरनामा : विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, कृषी उत्पन्न दुप्पट

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:44AMमंगळूर : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांचे उत्पन्न पुढच्या पाच वर्षांत दुप्पट करणे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची ग्वाही देणारा जाहीरनामा काँग्रेसने शुक्रवारी प्रसिद्ध केला. कृषि कॉरिडॉर स्थापन करण्याची ग्वाहीही जाहीरनाम्यात देण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील सभेत प्रकाशित केलेल्या 52 पानी जाहीरनाम्यात काँग्रेसने म्हटले आहे की, शेतकरी आणि शेतमजूरांना उदरनिर्वाहाची हमी देण्यासाठी कृषी उत्पन्न आयोगाची स्थापना करण्यात येईल. शेतकर्‍यांसाठी विशेष कृषी कॉरिडॉर स्थापन करून पेरणीपासून शेतमाल विकला जाईपर्यंतची सारी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. शेतीसाठी पायाभूत सुविधा, शेतीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंग अशी व्यवस्था कॉरिडॉरमध्ये असेल.

राहुल गांधी म्हणाले, मागील निवडणुकीत आम्ही जी आश्‍वासने दिली, त्यांची पूर्तता केली. आताही जाहीरनाम्यातील सर्व आश्‍वासनांची पूर्तता करण्यास मी आणि आमचे नेते वचनबद्ध आहोत. महान संत जगज्योती बसवेश्‍वरांच्या ‘बोले तैसा चाले’ या तत्वज्ञानावर आमचा दृढविश्‍वास आहे. 

भाजपवर टीका

राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रकाशनानंतर भाजपवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान आपल्या ‘मन की बात’मध्ये आपले विचार लोकांसमोर मांडतात. परंतु हा जाहीरनामा म्हणजे राज्यातील जनतेची ‘मन की बात’ आहे. या जाहीरनाम्यात जनतेचा आवाज, विचार आणि सूचनांचा पूर्ण विचार केला आहे. 

भाजपचाही जाहीरनामा काही दिवसांत येईल. ते कर्नाटकाच्या जनतेसाठी काय योग्य नि अयोग्य हे ठरवतील. पण आमचा जाहीरनामा आम्ही निश्‍चित केलेला नाही, तो कर्नाटकाच्या जनतेनेच निश्‍चित 
केला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या  म्हणाले, हा काँग्रेसचा नव्हे तर  जनतेचा जाहीरनामा आहे. 2013 च्या निवडणुकीत दिलेल्या सर्व आश्‍वासनांची पूर्तता केली. मोफत शिक्षण दर्जेदार देण्यास आमचे सरकार  बांधील राहील. 

व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आदि होते.

बेळगावसाठी स्वतंत्र जाहीरनामा

शुक्रवारचा काँग्रेसचा जाहीरनामा संपूर्ण राज्यासाठी आहे. त्याशिवाय बेळगाव, गुलबर्गा, बंगळूर आणि म्हैसूर या चार विभागांसाठी काँग्रेस स्वतंत्र जाहीरनामे प्रकाशित करेल, अशी घोषणा काँग्रेसने सभेत केली.

एक कोटी रोजगारनिर्मितीची ग्वाही

येत्या पाच वर्षांत कर्नाटकात एक कोटी रोजगार निर्मितीची ग्वाही जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. तसेच ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांना एक कोटींचे इनाम देण्याचीही घोषणा जाहीरनाम्यात आहे.