होमपेज › Belgaon › माणसातला देव शोधावा

माणसातला देव शोधावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कारदगा : प्रशांत कांबळे

आपल्या देशात अनेक जाती, धर्म आहेत. प्रत्येक धर्मात अनेक उत्सव, सण साजरे होतात. ते साजरे करण्यामागचा उद्देश असा की सर्वमानव एक आहोत. पण आज माणूस माणसापासून दूर जाताना दिसत आहे. कारण जो तो आपल्या जातीचा गुलाम बनला आहे. देव माणसातच आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवजात ही एकच जात मानावी, यासाठी माझा लढा सुरू  असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.राजन खान यांनी केले.

साहित्य विकास मंडळ कारदगा व ग्रामस्थांच्या वतीने रविवारी बी. एस. नाडगे कॉलेजच्या पटांंगणावर 22 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

खान म्हणाले, आज आपण संविधानदिन, प्रजासत्ताकदिन यासारखे दिवस पाळतो. मात्र, त्या दिवसाचे पालन करत नाही. त्यामुळे आम्ही भारतीय आहोत का, असा प्रश्‍न मनामध्ये येतो. कारदग्यासारख्या ग्रामीण व सीमाभागात 22 वर्षे अखंडपणे साहित्याचा जागर केला जात आहे. ही या संमेलनाच्या कार्यकर्त्याची एकजूट महत्त्वाची वाटते. ग्रामीण भागात भरत असलेल्या संमेलनामध्ये राजकारण कुठेही दिसत नाही.

कारदग्यासारख्या संमेलनात साहित्यिकांबरोबर राजकारण्यांनाही बोलावले जाते ही अभिमानाची गोष्ट आहे. संमेलनामधून राजकारणी मंडळींनी मध्येच उठून जाऊ नये. आमच्याकडील मराठीतील समीक्षक कोणतेही पुस्तक न वाचता भाषणे देतात; पण सीमाभागातील आमदार असो की राजकीय व्यक्ती आमच्यासारख्या साहित्यिकांची पुस्तके वाचतात. याचे समाधान वाटते. देव माणसातच आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ज्याचे विचार चांगले तोच जीवनात यशस्वी ठरतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संविधान तयार केले. त्या संविधानाचे आम्ही पालन करतो का? आम्ही माणूस म्हणून लायक आहोत का? हे तपासून पाहिले पाहिजे. खा. प्रकाश हुक्केरी म्हणाले की, येथील साहित्यिक तळमळ पाहून हे संमेलन तालुका व जिल्हा पातळीपर्यंत भरण्यासाठी आमचा सदैव पाठिंबा राहील. संमेलनात भाषाभेद नाही. कर्नाटक, महाराष्ट्रातील लोक आम्ही एकीने राहतो.