Thu, Apr 25, 2019 06:10होमपेज › Belgaon › कंग्राळीचा कचरा टाकायचा कुठे?

कंग्राळीचा कचरा टाकायचा कुठे?

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMबेळगाव : प्रतिनिधी

गावच्या हद्दीत शहर घुसल्याने कंग्राळी (बु.) ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. कचरा टाकण्यापासून ते स्मशानभूमीपर्यंतचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विविध योजनांसाठी सरकारने गावची सरकारी जागा संपादित केल्याने सार्वजनिक वापरासाठी जमिनीची वानवा भासत असून ग्रामस्थांतून कचरा टाकायचा कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाने वेगवेगळ्या कारणांसाठी गावातील सार्वजनिक वापराच्या जागा संपादित केल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना जागेची चणचण भासत असून स्मशानभूमीपासून अनेक प्रश्‍न त्यांना सतावत आहेत.

मागील काही दिवसापासून कचर्‍याची उचल ग्रा. पं. च्या माध्यमातून होत नसल्याने युवकांनी हा  कचरा रस्त्यावर फेकून संताप व्यक्‍त केला होता. ऐन पावसाच्या तोंडावर ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्य समस्येचा प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्‍त करून कचरा रस्त्यावर टाकण्याचा प्रकार घडला.

यानंतर ग्रा. पं. सदस्य व ग्रामविकास कमिटीच्या सदस्यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील काही गल्लीतील कचरा मनपाकडून उचलला जातो. मात्र मध्यंतरी कचरा उचल ठप्प झाल्याने  समस्या निर्माण झाली होती. 

यावर तोडगा काढत ग्रा. पं.ने कचर्‍याची उचल केली. यामुळे हा प्रश्‍न सुटला. मात्र, कचर्‍याची समस्या कंग्राळी ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून  भेडसावत आहे. गावाला कचरा प्रकल्प राबविण्यासाठी सरकारी जागेची कमतरता आहे. यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

गाव शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असल्याने उपनगरांनी गावाला घेरले आहे. अनेक वसाहती मोठ्या प्रमाणात वसल्या आहेत. यामुळे गावाला शहराचे स्वरूप आले असून नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी एपीएमसीसाठी शेकडो एकर जागा संपादित करण्यात आली. यानंतर उपनगरासाठी जागा घेण्यात आल्या. कुमारस्वामी लेआउटसाठीदेखील संपादन करण्यात आली. वेगवेगळे प्रकल्प रिकाम्या जागेत उभे केल्याने ग्रा. पं.ला जागेचा प्रश्‍न भेडसावत आहे.

ग्रा. पं. ने कचरा प्रकल्पासाठी एपीएमसी आवारातील जागा मिळावी, अशी मागणी केली. मात्र अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. सध्या ग्रा. पं. कडे एकही जागा शिल्लक नाही. यामुळे कचरा प्रकल्प राबवायचा कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.