Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Belgaon › म्हादईप्रश्‍नी गोव्याला न्याय मिळणारच : केसरकर

म्हादईप्रश्‍नी गोव्याला न्याय मिळणारच : केसरकर

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी 

म्हादईप्रश्‍नी गोव्याला न्याय मिळालाच पाहिजे. म्हादई नदीच्या पाणीवापरात गोव्याचा प्रमुख वाटा आहे. कर्नाटक म्हणते त्याप्रमाणे महाजन अहवालानुसार खानापूर तालुका महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे म्हादई नदीवर कर्नाटकाचा कोणताही  हक्क राहत नाही, असा दावा येथे पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. 

केसरकर म्हणाले, म्हादई पाणीवाटप तंटा कर्नाटकाबरोबरच गोवा व महाराष्ट्र या एकूण तीन राज्यांमध्ये आहे. कर्नाटक स्वार्थासाठी म्हादईचा नैसर्गिक प्रवाह कालव्याद्वारे बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. ते बेकायदेशीर आहे. नैसर्गिक प्रवाह बदलल्याने त्याचे गंभीर परिणाम गोव्यावर होणार आहेत. गोवा  लहानसे राज्य असून  तेथे नैसर्गिक साधनसामग्रीही कमी आहे. याउलट कर्नाटकातून कृष्णा, कावेरीसह इतर मोठ्या नद्या वाहत असल्याने नैसर्गिक साधनसामग्री मोठ्या प्रमाणात आहे. 

खासगी कामकाजाकरता ते बेळगावच्या दौर्‍यावर आले होते. सरकारी विश्रामधाम येथे त्यांची पत्रकारांनी भेट घेऊन म्हादईबद्दल प्रश्‍न केला. त्यांनी गोव्याला ती नदी म्हणजे संजीवनी असल्याचे सांगितले. म्हादई प्रकरणी लवादामध्ये निश्‍चितच  गोव्याच्या बाजूने अंतिम निकाल लागणार आहे. त्याबद्दल कोणताही आपल्याला संशय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

म्हादई प्रकरणी कर्नाटकाने गोव्याची समस्या समजून घ्यावी. कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यामधील सीमाप्रश्‍न अनेक वर्षापासून बेळगाव शहर व सभोवतालच्या मराठी बहुल गावांमुळे प्रलंबित राहिलेला आहे. महाराष्ट्र सरकारने बेळगावसह 865 मराठी भाषक गावांवर हक्क सांगितला आहे. तो खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. 

सर्वोच्च न्यायालयच सीमाप्रश्‍नी योग्य असा निकाल देईल, असा ठाम विश्‍वासही दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.