Fri, Jul 03, 2020 03:46होमपेज › Belgaon › तीस हजार लोकसंख्येसाठी दोनच पोलिस !

तीस हजार लोकसंख्येसाठी दोनच पोलिस !

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 10:12PM

बुकमार्क करा

जांबोटी : विलास कवठणकर

पश्‍चिम भागाचे मुख्य केंद्र असलेल्या जांबोटीला अनेक समस्यांंनी घेरले असताना सुरक्षेच्या समस्येची त्यात भर पडली आहे. जांबोटीत पोलिस ठाणे स्थापन करुन अनेक वर्षे उलटली तरी अपुर्‍या मनुष्यबळामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्ह्यावर अंकुश ठेवणे अथवा तक्रारींचे वेळेत निवारण होणे कठीण झाले आहे. 

जांबोटी जि. पं. विभागातील  30 हजार लोकसंख्येसाठी दोनच पोलिस कार्यरत असल्याने 43 गावांचा भार त्यांच्यावर पडला आहे. त्यामुळे पोलिसबळ वाढविण्याची गरज आहे.  जांबोटी विभागात सहा पंचायती येत असून त्यामध्ये 43 गावे येतात. त्यामुळे पंचायतीप्रमाणे सात पोलिसांची गरज आहे. जांबोटी, ओलमणी, आमटे, बैलूर, कालमणी,कापोलीसह मोजकीच गावे वगळता सर्व इतर गावे जंगल परिसरात दूरवर वसली आहे. त्यामुळे त्याठिकाणी तपास अथवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी पूर्ण दिवस जातो. त्यामुळे अशावेळी येणार्‍या तक्रारदारांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. शिवाय अनेक ठिकाणी झालेल्या अपघातांचा पंचनामा करण्यास विलंब होतो.

जांबोटी-चोर्ला मार्गावर दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत असताना त्यावर नियंत्रण आणण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले आहे. वर्षभरात अवैध धंद्येही वाढले असून शनिवार-रविवारी त्यात अधिक भर पडत आहे. तसेच जांबोटी स्थानकावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अलिकडच्या तीन वर्षात जांबोटीसह परिसरात चोर्‍या, विविध गुन्हे व लहान-सहान तक्रारी वाढल्या आहेत. त्याचे वेळेत निवारण होत नसल्याने नागरिकांना अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. जांबोटी स्थानकावर दोनवेळा दुकानफोडी झाली आहे. तसेच कणकुंबी भागातही मूर्ती चोरीचे प्रकार वाढले आहेत. जांबोटी विभागातील सात पंचायतींच्या ग्रामसभांसह विविध कार्यक्रमांना पोलिसांना अमंत्रण दिले जाते. मात्र, पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे सर्वत्र जाणे शक्य होत नाही.