Sun, Nov 18, 2018 01:13होमपेज › Belgaon › आज होणार गुलालाची उधळण, आतषबाजी

आज होणार गुलालाची उधळण, आतषबाजी

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:55AMबेळगाव : प्रतिनिधी 

निकालाची वेळ जशी जवळ येत आहे तशी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. निकाल निश्‍चित नसल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांधून निरुत्साह दिसून येत आहे. मात्र, गुलाल, फटाके, पेढे विक्रेत्यांनी तयारी पूर्ण केली आहे. मंगळवारी निकाल लागताच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. यासाठी विक्रेते सज्ज झाले आहेत. 

जिल्ह्यातील 18 मतदारसंघांचा निकाल मंगळवारी आरपीडी कॉलेजमध्ये जाहीर केला जाणार आहे. निकाल ऐकण्यासाठी जिल्हाभरातून उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थितीत दर्शविणार आहेत. कार्यकर्त्यांना निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

निकालादरम्यान कार्यकर्त्यांची गर्दी होणार असल्याने ठिकठिकाणी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यासाठी विक्रेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी होणार आहे. यासाठी गुलाल व फटाके विक्रेते देखील सज्ज झाले आहेत. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर विक्रेत्यांनी दुकानांमध्ये स्टॉक वाढविला आहे. काही उमेदवारांनी विजयाची शक्यता गृहीत धरून वाजंत्र्यांशी संपर्क साधून दरही ठऱविले आहेत. 

सध्या बाजारपेठेत फटाके, गुलाल विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कांदा मार्केट, नरगुंदकर भावे चौक, शहापूर, खडेबाजार आदी ठिकाणी फटाकडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच गणपत गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी गुलालाची पोती विक्रीसाठी ठेवली आहेत. गुलाल प्रति पाच किलो 190 ते 230 रुपये, 25 किलोला 950 रुपये असा दर आहे. यंदा पेढ्यांपेक्षा ओल्या पार्ट्या करण्याकडे उमेदवार व कार्यकर्त्यांचा कल दिसून येत आहे.  यामुळे पेढ्यांना मागणी घटली आहे, अशी माहिती पेढे विक्रेत्यांनी दिली.