होमपेज › Belgaon › बेरोजगारीची वाढती संख्या चिंताजनक

बेरोजगारीची वाढती संख्या चिंताजनक

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 19 2018 8:56PMएकसंबा : राजेंद्र केरुरे

दिवसेंदिवस शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत असताना दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या चिंताजनक असून कौशल्य आधारित शिक्षणाचा अभाव याचे एक कारण आहे. प्राथमिक शिक्षणापासून कौशल्याधारित शिक्षण मिळण्यासाठी ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन अनेक युवक घरीच बसून आहेत.कौशल्य शिक्षणाच्या अभावातून ग्रामीण भागात संख्या अधिक दिसत आहे. पूर्वी शिक्षणाचा अधिक प्रसार नसल्यामुळे बहुतांश प्रमाणावर लोक निरक्षर होते. त्यावेळी लोक शेती व्यवसायाकडे वळताना दिसत होते. पण सध्या शिक्षणाचा व्यापक प्रसार झाला असून प्रत्येक व्यक्तीला किमान शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे.

सध्या विविध प्रकारच्या  कोर्सेसच्या माध्यमातून शिक्षण घेत युवक सुशिक्षित बनले. पण उच्च शिक्षणानंतर युवकांची नोकरीच्या शोधात परवड होताना दिसत आहे. युवकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा  आहे. शिक्षणाचा प्रसार वाढल्याने शहरी भागासह ग्रामीण युवक मोठ्या प्रमाणावर ज्ञानाच्या प्रवाहात आले.

कोर्सेससाठी होणारा खर्च पाहता सध्या डोक्याला हात धरून बसण्याची वेळ आली आहे. मुले उच्च शिक्षित होऊन नोकरीस लागल्यावर आयुष्यात सुखाचे दिवस येतील, असे स्वप्न  बाळगलेल्या मुलांच्या पाल्यांनाही निराशा येत आहे. अनेक ठिकाणी सध्या एजंटगिरी, वशिलेबाजी फोफावत असल्याने शिक्षण घेऊनही नोकरी मिळणे कठीण बनले आहे. यामुळे ग्रामीण भागात सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी ग्रा. पं. ने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रा. पं. ने शासकीय नोकर भरतीची माहिती ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रा. पं. ने आपल्या कार्यक्षेत्रात असणार्‍या बेरोजगारांची माहिती संकलित करुन त्याचा अहवाल कामगार खात्याला द्यावा. सरकारी, निमसरकारी नोकरीच्या संधीमध्ये भाग घेण्याची सूचना ग्रामीण भागातील युवकांना मिळाल्यास सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.