होमपेज › Belgaon › गौरी-शंकर मुखवट्यांची वाढती क्रेझ

गौरी-शंकर मुखवट्यांची वाढती क्रेझ

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 8:43PMबेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरातील मूर्तिकारांच्या शाळेत गणेशमूर्तींबरोबरच गौरी-शंकराच्या मुखवट्यांवर मूर्तिकार अखेरचा हात फिरवित आहेत. अलिकडील काही दिवसांपासून गणेेेश मूर्तीबरोबर देव-देवतांच्या लहान प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. 

हिंदू धर्मियांत गणेशोत्सवाला मोठे महत्त्व आहे. गणेशपूजनाबरोबर अन्य देवदेवतांचे पूजन भक्‍तिभावाने केले जाते. त्यामुळे भाद्रपद महिन्यात येणार्‍या गौरी गणपती सणात गौरी पूजन महिलांकडून उत्साहात  करण्यात येते. ज्या कुटुंबात नववधू  आहेत, तेथे गौरी पूजनाला वेगळे महत्त्व असते.  

येथील बाजारपेठेसह काही लहान मूर्तिकारांंच्या शाळेत गौरीचे मुखवटे विक्रीस ठेवण्यात आले आहेत.  गौरींच्या सजावटीसाठी लागणारे दागिने, स्टँड आकर्षक रुपात बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पूर्वी  केवळ गौरीमूर्तीसह शंकराच्या मूर्तीचे पूजन होत असे. मात्र अलिकडील काळात विविध देव-देवतांच्या मूर्तीं सोबत ठेवण्याची प्रथा वाढत आहे. राधा-कृष्ण, विठ्ठल-रखुमाई, म्हाळसा-खंडेराया या देवदेवतांच्या लहान मूर्तीना मागणी आहे. शंकराचा मुखवटा 350 रु., गौरीचा 300 ते 600, गौरीचा पूर्णाकृती पुतळा 3500 रु. असे दर आहेत.  मुखवट्यांचा पोषाखही आकर्षक स्वरुपात उपलब्ध आहे. सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र, कंमरपट्टा, पुणेरी नथ, लक्ष्मीहार, चंदेरी-सोनेरी मुकुटांची बाजारपेठेत रेलचेल आहे. अशा वस्तू 100 ते 1000 रुपयांपर्यंत  उपलब्ध आहेत.