Fri, Apr 26, 2019 18:13होमपेज › Belgaon › बेळगाव, केदनुरात प्राप्तिकर छापे

बेळगाव, केदनुरात प्राप्तिकर छापे

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMबेळगाव : प्रतिनिधी

कर्मचार्‍यांनी पैशाची अफरातफर केल्यामुळे चर्चेत आलेल्या आणि ठेवीदारांची चिंता वाढवणार्‍या शहरातील एका सहकारी सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकून ठेवींची चौकशी केली. तसेच या सोसायटीत कोट्यवधींची ठेव असलेल्या कुदनूरच्या एका जवानाच्या घरावरही प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

शहरातील संंगोळी रायण्णा को-ऑप. सोसायटीमध्ये झालेल्या गैरकारभारावरून  सहकारी सोेसायटींमध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले आहे. त्यात आता बहुतांश सुवर्णकार संचालक असलेल्या सोसायटीवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. बुधवार, दि. 8 रोजी सकाळी आयटी अधिकार्‍यांनी सोसायटीच्या कारभाराची चोकशी सुरू केली होती. ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. 

सोसायटीच्या ठेेवीदारांचीही चौकशी करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे अनेक ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. शहरामध्ये सोसायटीच्या दोन शाखा आहेत. दोन्ही शाखांमधील अनेक ठेवीदारांना बोलावून अधिकार्‍यांनी  त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय, अशी चौकशी चालवली आहे. पैसा कुठून आला, आयटी रिटर्नस भरला की नाही, ही चौकशीही केली जात आहे. 

केदनूर (ता. बेळगाव) येथील सैनिकाच्या घरावर आयटी विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून चौकशी हाती घेतली आहे. या जवानाने उत्तर प्रदेश येथे सेवेत असताना सैनिकांच्या सोसायटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार झाली आहे, यावरुन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

काकती पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या या गावामध्ये आयटी विभागाच्या अधिकार्‍यांना काकती पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते. सकाळी  10 वा. आयटी विभागाच्या अधिकार्‍यांनी  तपास सुरु केला होता. सायंकाळी उशीरा पर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. सदर जवानाच्या नातलगांच्या वडगाव येथील घरावर व जाधवनगर येथील फ्लॅटवर सुध्दा छापा टाकुत तपासनी  करण्यात आल्याचे समजते.

दोन्ही ठिकाणी आयटी विभागाच्या अधिकार्‍यांनी रात्री  9 वाजेपर्यंत कारवाई सुरु ठेवली होती. मात्र अधिकार्‍यांनी कोणत्याच प्रकारची माहिती देण्यास नकार दर्शविला.