Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Belgaon › कॉन्व्हेंटलाही हेवा वाटण्याजोगी शाळा किरवळेत

कॉन्व्हेंटलाही हेवा वाटण्याजोगी शाळा किरवळेत

Published On: Mar 05 2018 9:21PM | Last Updated: Mar 05 2018 9:17PMखानापूर : वासुदेव चौगुले

सरकारी शाळा म्हणजे नाक मुरडण्याइतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना किरावळे सरकारी मराठी प्राथ. शाळेच्या शिक्षकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने  ज्ञानमंदिराला हटके रुप देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करुन दाखविले आहे. यंदाचा परिसर मित्र पुरस्कार देऊन येथील शिक्षकांच्या धडपडीचे शासनानेही कौतुक केले आहे. 

कोणत्याही कॉन्व्हेंट शाळेच्या दर्जाला आव्हान ठरु शकेल, असे  शैक्षणिक वातावरण आणि प्रतिभावान विद्यार्थी घडविण्याची किमया एका सरकारी शाळेने साधल्याने इतरांकडून या आदर्शाचे अनुकरण अपेक्षित आहे. बेळगाव-गोवा महामार्गावरील गुंजी गावापासून सहा किमीवर डोंगराच्या पायथ्याशी किरावळे गाव वसले आहे. गावच्या बाहेरुन जाणार्‍या रेल्वेमार्गालगत मराठी शाळेची इमारत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत जेमतेम वीस विद्यार्थी धडे गिरवतात. गाव छोटेसे असल्याने त्यामानाने शाळेची इमारतही एका वर्गखोलीपुरता मर्यादित होती. सात वर्ग, तीन शिक्षक आणि एक वर्गखोली यामुळे शिकविताना अडचण निर्माण होऊ लागली. 

शिक्षकांकडून  नाविन्याचा ध्यास

स्वतः शिक्षकांनी पुढाकार घेतला. अन्  ग्रामस्थांच्या मदतीने एका वर्गखोलीची निर्मिती केली. येथील शिक्षक शिक्षकीपेशा अक्षरशः जगत असल्याचे दिसून आले. सतत नाविन्याचा ध्यास बाळगलेल्या शिक्षकांनी शाळेभोवती उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा खुबीने उपयोग करुन घेण्याचे ठरविले.

डोंगरावरुन वाया जाणारे झर्‍याचे पाणी शाळेपर्यंत आणले. टाकीची उभारणी केल्याने चोवीस तास बारा महिने पाणी उपलब्ध झाले. त्यातून परिसरात फुलझाडे, भाज्या व फळझाडे लावली. आज शाळेसमोरील बगीचा बहरल्याचे चित्र दिसून येते. विद्यार्थ्यांना बागेत नेऊन विज्ञान व परिसर अध्ययनाचे विषय निसर्गाच्या सानिध्यात नेऊन शिकवले जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 50 वनस्पती सहज ओळखता येतात.

निसर्गप्रेम वाढीस लागल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थही शाळेच्या निसर्गरम्य परिसराची स्वतः आपुलकीने काळजी घेतात. झाडांना पाणी देतात. बगीच्याची देखभाल करतात. शाळेच्या परिसरात कचरा बघायलाही मिळत नाही. टाकाऊ पदार्थांचा साठा करुन कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. तेच खत झाडांना वापरले जाते.

रोज शाळेतच विपूल प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्याने आहारात सकस पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील शाळांतही नसेल इतकी उत्तम निगा येथील स्वच्छतागृहांमध्ये पाहायला मिळते.

शिक्षकांनी अभ्यासक्रमातील सर्व माहिती वर्गखोल्यांच्या भिंती आणि फरशीवर आकर्षकरित्या चितारली असल्याने शाळा सुटल्यानंतरही मुलांना वर्गखोली सोडवत नाही. 

मुख्याध्यापक बाळासाहेब चापगावकर, यल्लाप्पा कुकडोळकर आणि हुक्केरी या शिक्षकांच्या कामगिरीमुळे समाजाचा सरकारी शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. 
नुकताच या शाळेचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने कै. शांताबाई पाटील आदर्श शाळेचा पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.