Wed, Jul 24, 2019 06:18होमपेज › Belgaon › ‘ज्यांनी बेकी केली, त्यांना बोलवा’

‘ज्यांनी बेकी केली, त्यांना बोलवा’

Published On: Apr 16 2018 1:38AM | Last Updated: Apr 16 2018 1:30AMबेळगाव : प्रतिनिधी

आम्ही एकीला कधीही तयार आहे. ज्यांनी बेकी केली, त्यांना आधी चर्चेला बोलवा, अशी भूमिका ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी एकीसाठी प्रयत्न करणार्‍या युवा कार्यकर्त्यांसमोर मांडली. त्यानंतर बंडखोर गटाच्या नेत्यांना चर्चेला बोलावण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालला होता. सोमवारी पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

म. ए. समितीचे पाईक या नावाखाली शहर-तालुक्यातील काही युवक एकत्र आले असून त्यांनी सीमाभागातील प्रत्येक मतदारसंघात एकच सर्वमान्य समिती उमेदवार असावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच त्यांनी आज डॉ. पाटील यांची त्यांनी उतरलेल्या हॉटेलमध्ये भेट घेऊन एकीचे निवेदन दिले.

निवेदन स्वीकारून डॉ. पाटील म्हणाले, सर्वमान्य एकच उमेदवार असावा हीच आमचीही इच्छा आहे. पण एकीची प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडावरच का? बाकीच्या वेळीही सीमाभागातील नेते एकत्र नकोत का? शिवाय 2013 मध्येही मध्यवर्ती समितीने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले असताना शिवाजी सुंठकर यांनी बंडखोरी केली. त्यांच्यावर एकीसाठी तुम्ही दबाव आणला का़? त्यांना पाठिंबा देण्याचे काम कुणी केले़? त्यांना पाठिंबा देणार्‍यांनीच बेकी केली आहे. त्यांना चर्चेला बोलवा, आम्ही एकीसाठी तयार आहे.

एकी ही एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही. म. ए. समितीची पुनर्रचना करताना कोणालाही वगळण्यात आलेले नाही. ज्यांनी बेकी केली त्यांना याबाबत जाब विचारला पाहिजे. आम्ही कोणालाही बाजूला सारलेले नसून सर्वांनी  मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असेही डॉ. पाटील म्हणाले. 

त्यानंतर काही कार्यकर्ते बेकी करणार्‍या नेत्यांशी संपर्क साधून त्यांना चर्चेला आणण्याचा प्रयत्न करत होते. तर काही कार्यकर्ते प्रा. पाटील यांच्याशी चर्चा करत होते. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्यास सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

खानापुरातील उमेदवार निवड पद्धत नियमबाह्य

खानापूर तालुका म. ए. समितीने उमेदवार निवडीसाठी वापरलेली पद्धत नियमबाह्य असून त्यामुळे त्यांनी जाहीर केलेली उमेदवारीही नियमबाह्य आहे. म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांची घोषणा मध्यवर्ती समितीच करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी रविवारी दिली. 

परिणामी खानापूर समितीचे अध्यक्ष दिगंबर यांनी शनिवारी विलास बेळगावकर यांच्या नावाची केलेली घोषणा मध्यवर्तीने मंजूर केलेली नाही, हे स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीबाबत मध्यवर्ती म. ए. समितीशी चर्चा करण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील रविवारी बेळगावला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.