होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यासाठी उद्यापासून उपोषण

चिकोडी जिल्ह्यासाठी उद्यापासून उपोषण

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:41AMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी  सोमवार दि. 5 पासून चिकोडीत बेमुदत उपोषणासह धरणे आंदोलन केले जाणार असून चिकोडी, अथणी, रायबाग, निपाणी व कागवाड तालुक्यातील सर्व संघ संस्थांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ नेेेते बी.आर.संगाप्पगोळ यांनी केले.

शहरातील सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दि. 5 रोजी सकाळी 10 पासून शहरातील बसव सर्कल येथे उपोषणास सुरुवात होणार आहे. राज्यात सर्वाधिक मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक आहे. विभाजनाअभावी या भागासह 25 लाख लोकांचा विकास खुंटलेला आहे. यादगीर, चामराजनगर, चिक्कबळापूरसारख्या छोट्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली पण चिकोडीसाठी उदासिनता का ? मुख्यमंत्र्यांनी बेळगाव अधिवेशनात चिकोडी जिल्ह्यास तयार असल्याचे सांगितले होते. 26 जानेवारी रोजी घोषणा होईल अशी असलेली आशा फोल ठरली. त्यामुळे आता 5 तारखेपासून आंदोलन करण्यात येणार आहे. 

या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, जि.पं., ता.पं. ग्रा.पं.सदस्य व सर्व साखर कारखाने, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, बार असोसिएशन, केएसआरटीसी, आयएमएसह सर्व संघटना व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आ.बाळासाहेब वड्डर म्हणाले, आपण आमदार असताना केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन  मुख्यमंत्री जे.एच.पटेल यांनी जिल्ह्याची घोषणा केली होती. पण काही संघटनांच्या विरोधामुळे चोवीस तासात चिकोडी जिल्हा मागे घेण्यात आला होता. सध्या मुख्यमंत्री जिल्ह्यास तयार असून नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा द्यावा. 

यावेळी शेतकरी संघटनेचे त्यागराज कदम, माजी आ. दत्तू हक्क्यागोळ, समाजसेवक चंद्रकांत हुक्केरी, संजू बडिगेर, दलित संघर्ष समितीचे बसवराज ढाके आदी उपस्थित होते.