हुक्केरी : प्रतिनिधी
आपल्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात जेलला पाठविल्याच्या रागातून मुलानेच आईवर कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कमतनूर येथेे घडली आहे. ज्योती रमेश माळी (वय 40) असे गंभीर जखमी आईचे नांव आहे. तालुक्यातील कमतनूर येथेे माळी कुटुंबीय राहत असून आई ज्योती व मुलगा अमृत यांच्यात वारंवार भांडण, वादविवाद होत असे. यासंबधीचा गुन्हा संकेश्वर पोलिस स्थानकात दाखल केला होता. त्यामुळे वडील रमेश अद्यापही हिंडलगा कारागृहात आहेत.
आपल्या आईने व बहिणीने माझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून कारागृहात पाठविले या संशयातून रागातून वारंवार मुलगा अमृत हा आई व बहिणीबरोबर भांडण करीत होता. त्याच कारणामुळे आज सकाळी 10 च्या दरम्यान घरात त्यांचा वाद झाला. त्यातून त्याने कुर्हाडीने आईवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांना उपचारासाठी बेळगांव सिव्हील इस्पितळात दाखल करण्यात आले होते; पण प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस व हुक्केरी सीपीआय संदिप मुरगोड घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आरोपी मुलास अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास करीत असल्याचे सीपीआय मुरगोड यांनी सांगितले.