Thu, Jan 17, 2019 02:54होमपेज › Belgaon › घरांचे आमिष दाखवणार्‍याची अर्धनग्न धिंड

घरांचे आमिष दाखवणार्‍याची अर्धनग्न धिंड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

आश्रय योजनेतून घरे मिळवून देण्याचे सांगून पैसे लाटल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी एकाची अर्धनग्न करून धुलाई केल्याची घटना मंगळवारी सकाळी जिल्हा इस्पितळ आवारात घडली. 

महम्मद रफिक देसाई (वय 50, रा. चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र, ही मारहाण राजकीय द्वेषातून करण्यात आली आहे, असा आरोप देसाई यांनी केला असून,  एपीएमसी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर वारंवार मोर्चे काढून झोपडपट्टीवासीयांना-गरिबांना घरे मिळवून देण्यासाठी लढा देणार्‍या महम्मद देसाई याने अनेक महिलांना आश्रय घर देण्याचे सांगून लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला. याच प्रकरणावरून सकाळी 8 च्या दरम्यान जिल्हा इस्पितळ आवारात महिला व काही युवकांनी घेराव घालून त्यांची धुलाई केली. 

महम्मदकडे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना नाष्टा व जेवण पुरविण्याचे कंत्राट आहे. त्यासाठी मंगळवारी सकाळी ते सिव्हिलमध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना घेराव घालून मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार एपीएमसी पोलिसांत दाखल केली आहे. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी धाव घेऊन देसाई यांना ताब्यात घेऊन नागरिकांच्या घेरावातून सोडवणूक केली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर  उपचार करण्यात येत आहेत. 

दरम्यान, घरासाठी पैसे स्वीकारले नसल्याचा दावा देसाई यांनी केला.  आमदाराचा अपप्रचार करत असल्याचे सांगून मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. एपीएमसी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी आ. फिरोज सेठ यांच्या विरोधात अपप्रचार करत असल्याच्या रागातून त्यांच्या हस्तकाकडून आपल्याला मारहाण करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तौसिफ अलवाडकर, अब्बू मुल्ला, इम्तियाज यासह अनेक जणांविरोधात एपीएमसी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


  •