Fri, Apr 26, 2019 19:56होमपेज › Belgaon › होळी-रंगपंचमीसाठी बेळगावनगरी सज्ज

होळी-रंगपंचमीसाठी बेळगावनगरी सज्ज

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:22AMबेळगाव : प्रतिनिधी

आज साजर्‍या होत असलेल्या होळीबरोबर आबालवृध्दांना  शुक्रवारच्या रंगोत्सवाचे वेध लागले आहेत. शुक्रवारी पांगुळ गल्लीत  अश्‍वत्थामा मंदिराच्या लोटांगण कार्यक्रमाची आतुरता आहे. मंगळवारी (दि. 6) शहापूर, वडगाव, खासबाग, आदी उपनगरांत रंगपंचमी साजरी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन खबरदारी घेत आहे.

होळीनिमित्त शहर परिसरातील होळी कामण्णा मंदिराच्या रंगरंगोटी, साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रथेनुसार मंदिरासमोर होळी दहनासाठी लाकडे गोळा करण्याची लगबग सुरू आहे. रंगपंचमीसाठी बाजारपेठेत वेगवेगळे रंग तसेच नैसर्गिक रंग, आकर्षक पिचकार्‍या, मुखवटे, टिमक्या, डमरु, डफ असे साहित्य  आले आहे. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, 
किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली तसेच बाजारपेठेतील मुख्य रस्ते आणि उपनगरातील बाजारपेठेत कोरडे रंग, इतर रंगांसह सोनेरी, चंदेरी, साडी कलर तसेच हर्बल रंग, रंगांचे स्प्रे व इतर साहित्याचे स्टॉल सजले आहेत. रंग व अन्य साहित्य खरेदीसाठी मुले गर्दी करत आहेत.

रंगपंचमीसाठी तरुणाई सज्ज झाली आहे. यावर्षीही माजी आ. अभय पाटील यांच्यावतीने व्हॅक्सीन डेपो मैदानावर ‘होली मीलन’ कार्यक्रम होणार आहे. महाद्वार रोडवरील संभाजी उद्यानात रंगोत्सवाचे आयोजन आहे. एमएलआयआरसीतर्फेही होलिकादहन करण्यात येणार आहे. 

बाजारपेठेत लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्‍या आल्या आहेत. यात मशिनगन व चायनामेड पिचकार्‍यांना मागणी आहे. टिमकी, ढोलकी विक्रेतेही दाखल झाले आहेत. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी  डोरेमॉन, छोटा भीम, कार्टुन शक्तिमान, टँक, मोदीजी, अँग्री बर्ड असे मुखवटे आणि आकर्षक टँकरˆगन, स्पायडर मॅन, भीम, बार्बी आकारातील नाना नमुन्यातील पिचकार्‍या दाखल झाल्या आहेत. विविध नमुन्यातील हॉरर आणि इतर प्रकारात मुखवटे व मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनानेही विशेष दक्षता घेतली आहे. धुळवडीला मद्यविक्रीवर निर्बंध आहेत. समाजकंटक होळीच्या आणि रंगपंचमीला सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतात.