Sun, Jul 21, 2019 12:51होमपेज › Belgaon › राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक महाल धोक्यात

राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक महाल धोक्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी रायबाग येथे उभारलेला ऐतिहासिक शिवतीर्थ महाल धोक्यात आला आहे. दुर्लक्ष झाल्यामुळे महाल कोसळण्याच्या स्थितीत असून राज्य सरकारने हा ऐतिहासिक ठेवा संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

कोल्हापूर संस्थानातील शेवटचे टोक म्हणून रायबाग शहराची ओळख होती. येथे कमी पाऊस असायचा. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी पावसाळ्यात राहण्यासाठी शिवतीर्थ महालाची उभारणी 1904 ते 1911 या कालावधीत केली. सध्या या महालाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला आहे. महालाच्या आजूबाजूच्या जागेवर अनेकांनी घरे उभारली आहेत. महालाची मालकी सध्या शाहू महाराजांच्या कोल्हापूर येथील त्यांच्या वंशजाकडे आहे. 

महालामध्ये दक्षिण आणि उत्तर असे दोन वाडे आहेत. दक्षिणेचा वाडा राजघराण्यातील महिलांसाठी राखीव होता. तर उत्तरेला उभारलेला वाडा राजाराम व्हिला म्हणून ओळखला जातो. हा वाडा   राजर्षि शाहू महाराजांचा मुलगा राजाराम यांनी 1935 साली उभारला. 

कोल्हापूर परिसरात पावसाळ्यात त्या काळात तुफान पाऊस कोसळत असे. त्या तुलनेत रायबाग परिसरात पावसाचे प्रमाण कमी असे. त्यामुळे पावसाळ्यात या महालाचा वापर शाहू महाराजाकडून करण्यात येत असे.

मागील दशकापासून शिवतीर्थ महालाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे एकेकाळी चैतन्याने सळसळणार्‍या महालाची रया गेली आहे. महालातील खुर्च्या, पलंग, चित्रे दुर्लक्षित आहेत. त्यांचे नुकसान होत आहे. मौल्यवान चित्रे खराब होत आहेत. काही ठिकाणी अशी चित्रे गायब झाली असून केवळ फे्रम शिल्लक आहेत. 

याबाबत माहिती देताना महालाचे व्यवस्थापक लगमाण्णा ढाले म्हणाले, महालाच्या देखरेखीसाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे. यामुळे महालाकडे दुर्लक्ष झाले आहे.


  •