Thu, Jan 24, 2019 11:53होमपेज › Belgaon › ऐन पावसाळ्यात कडकडीत ऊन

ऐन पावसाळ्यात कडकडीत ऊन

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी

पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असून शनिवार व रविवार दोन्ही दिवशी कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे हवेत उष्मा वाढल्याने गारवा नाहिसा झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. सध्यस्थितीत भात रोपलागवडीसाठी पावासाची गरज आहे. मात्र अद्याप मान्सून सक्रिय न झल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

रविवारी शहर परिसरात कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे उष्म्यात वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत आहेत.
जिल्ह्यात यंदा गेल्या पाच सहा वर्षात प्रथमच हजारो हेक्टर वाढीव क्षेत्रात पेरणी झाली आहे. बहुतांश शेती ही कोरडवाहू क्षेत्रात मोडते. यामुळे पावसाची नितांत गरज आहे. कोरडवाहू क्षेत्रातील भातपिकाला अद्याप धोका नसला तरी शेतकर्‍याने पावसाचा अंदाज धरून रताळी आणि बटाटा लावण पूर्ण केली आहे. या पिकांसाठी पावसाची गरज आहे. आज उद्या करत पावसाने हजेरी लावली आहे. मात्र पुन्हा मान्सून लांबणीवर गेल्याने चिंता वाढतच आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक गावात पाणीटंचाई भासत आहे. गोकाक, अथणी, रायबाग तालुक्यात यंदाचा पावसाळा खर्‍या अर्थाने सुरू झालेला नाही. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक गावातून पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. 

भात रोप लागवड करण्यासाठी पेरणी करण्यात आली आहे. मात्र योग्य वाढीसाठी पाऊस कधी सुरू होणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. हवामान खात्याचा अंदाज आणि पंचांग यांच्या निर्देशावर आधारित शेतकर्‍यांचे पेरणीबाबतचे नियोजन ठरते. मात्र यंदा संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. मृग नक्षत्रात हमखास पाऊस पडतो. मात्र मृग नक्षत्रापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रातही पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.