Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Belgaon › अवकाळी पावसाचा तडाखा

अवकाळी पावसाचा तडाखा

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 11:21PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे वीज खंडित होत होती. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कंँपमध्ये झाडाची फांदी कोसळून वीजभारित तार तुटल्याची घटना घडली. यामुळे काही काळ विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. बुधवारी रात्रीही पावसाने झोडपूफ काढले होते. पांगुळ गल्लीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांना त्रासाचा सामना करावा लागला. भोई गल्ली आदी भागात पावसाचे पाणी साचले होते. कँम्प उभा मारुती, महिला पोलिस स्टेशनसमोर झाड  वीजतारेवर कोसळले. यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खांबही जमीनदोस्त झाला. काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती. सांबरा रोड बसवण कुडची येथे महामार्गावर झाड कोसळले. शहरात श्रीनगर, महांतेशनगर, सह्याद्रीनगर आदी ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून पडले. बुधवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे बेळगाव - वेंगुर्ला रोडवर मधुरा हॉटेलनजीक झाड कोसळले. यामुळे वाहनधारकांना अडचणी आल्या. 

चार दिवसांपासून शहरात दुपारच्या वेळी वळीव पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट  झाल्यामुळे नागरिकांतही भीती पसरली. गुरुवारी दुपारी 3.30 पासून 4.45 वाजेपर्यंत पाऊस पडला. अचानक पडलेल्या वळीवामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले. काही दिवसांपासून हवेतील उष्म्यात कमालीची वाढ झाली होती. गुरुवारी सकाळपासून वातावरणात उष्मा अधिक जाणवत होता. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता. पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुख्य बाजारपेठेतील गर्दी कमी झाली. पाऊस गेल्यानंतर गर्दी पुन्हा वाढली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. विक्रेत्यांची धावपळ उडाली. पावसामुळे शेतकरी, प्रवासी व वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाऊस गेल्यानंतर बाजारपेठेतील परिस्थिती पूर्वपदावर आली. 

विजांच्या कडकडाटामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यावसायिकांची धावपळ उडाली. तासभर पडलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. पावसामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. मशागतीच्या कामांसाठी वळीव उपयुक्त ठरणार आहे. मात्र, कोथिंबीर व काकडी पिकाला फटका बसला.  बुधवारी मध्यरात्रीही शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पूर्व भागातील बसवनकुडची, निलजी, गांधीनगर, मुतगा, शिंदोळी, पश्‍चिम भागातील उद्यमबाग, खादरवाडी, पिरनवाडी, किणये, गणेशपूर, हिंडलगा, बेळगुंदी आदी भागात पाऊस पडला.