Fri, May 24, 2019 21:33होमपेज › Belgaon › बेळगावसह परिसरात संततधार; धरणाची पाणीपातळी 2476 फुटांवर 

बेळगावसह परिसरात संततधार; धरणाची पाणीपातळी 2476 फुटांवर 

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 17 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरण सोमवारी फुल्ल झाले. त्यामुळे बेळगाववासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत हे पाणी पुरू शकते. पाण्याने 2476 फुटांची पातळी गाठली आहे; पण धरण ओव्हरफ्लो होण्याआधीच दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

दरवर्षी राकसकोप धरण ओसंडून वाहिल्यानंतरच पाण्याचा विसर्ग करण्यात येत असे, मात्र खबरदारी म्हणून यंदा अगोदरच दोन दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

आधी धरणाची कमाल पातळी 2476 फूट होती. काही वर्षांपूर्वी पाणीपुरवठा मंडळाने दरवाजांची उंची अर्ध्या फुटाने वाढवली होती. त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे यंदा वाढीव अर्धा फूट भरण्याआधीच पाणीपुरवठा मंडळाने विसर्ग सुरू केला. जलाशयामधील तळाला असणारा गाळ वाहून जावा हाही एक उद्देश होता. गेल्या 24 तासांत राकसकोप जलाशय पाणलोटक्षेत्रात 83.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभर राकसकोप परिसरात मुसळधार सुरू असणार्‍या पावसाने ओेढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

सोमवारी परिसरात मोठा पाऊस झाला आणि धरणाच्या पाण्याने जुनी कमाल पातळी (2476 फूट) गाठली. त्यामुळे सोमवारी दरवाजा क्र. 2 आणि 5 प्रत्येकी 6 इंचांनी उघडण्यात आले. जलाशयाची पाणी पातळी रविवारी 2474.65 इतकी होती. त्यात सोमवारी अडीच फुटांनी वाढून सोमवारी 2476 फुटांवर पोचली.

पाणलोट क्षेत्रात 1356 मि.मी. पाऊस

जलाशय परिसरातील तुडये (ता. चंदगड), मळवी, बैलूर, बेटगेरी (ता. खानापूर), बोकमूर, इनाम बडस परिसरात पावसाने मुसळधार रूप धारण केले आहे. सोमवार, दि. 16 पर्यंत पाणलोट क्षेत्रात 1356 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सोमवारी क्र. 2 व 5 दरवाजा 6 इंचांनी उडघल्याने मार्कंडेय नदीचे पात्र विस्तारले आहे. यामुळे नदीकाठावरील ग्रा.पं. प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.